उंटवाडीत सिटीलिंक बसचा अपघात; चार वाहनांना धडक

दुचाकीस्वार थोडक्यात बचावले

सिडको : विशेष प्रतिनिधी
उंटवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास सिडकोकडे जाणार्‍या सिटीलिंक बसचा अपघात झाला. या अपघातात बसने मार्गावरील तीन ते चार वाहनांना धडक दिल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. उंटवाडी सिटी सेंटर मॉलजवळील सिग्नल परिसरात एका दुचाकीला धडक बसण्याच्या घटनेत दुचाकीवरील दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत वाहनावरून उडी मारल्याने ते थोडक्यात बचावले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली. तसेच घटनेनंतर बसचालकाने नागरिकांशी अरेरावी व शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक फडोळकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेऊन बससह अंबड पोलीस ठाण्यात नेले. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर बसचे दरवाजे काही काळ बंद असल्याने बसमधील प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागल्याची तक्रार नागरिकांनी केली. बसचालकासह संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

Citylink bus accident in Untwadi; crashes into four vehicles.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *