तीन घरफोड्या आणि मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-2ने आंतरराज्यीय रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपींना अटक करून घरफोडीचे तीन आणि मोटारसायकल चोरीचा एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले. आरोपींकडून चोरीची मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा 1 लाख 16 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घरफोडीतील सराईत आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2ने विशेष मोहीम हाती घेतली.
या मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना मेघराज बेकरी, पेठ रोड परिसरात काळ्या रंगाच्या होंडा शाईन (एमएच 15 ईडब्ल्यू 7588) मोटारसायकलवरून तीन संशयित बंद घरांची पाहणी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि संजय सानप, सपोउपनि शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आणि संतोष सुपेकर यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे दर्शनसिंग धरमसिंग शीख (वय 27, रा. सोरपाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार), समरेशसिंग रणजितसिंग शिकलीकर (वय 20, रा. दत्तनगर, अजवा रोड, वडोदरा, गुजरात) आणि बहादूरसिंग ओमकारसिंग शिकलीकर (वय 28, रा. पत्चौरी, ता. अकनाल, जि. बुर्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी सांगितली. अधिक चौकशी आणि तांत्रिक तपासादरम्यान त्यांनी घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल, घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 16 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे म्हसरूळ पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचा एक, पंचवटी, उपनगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक असे घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-2 चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि संजय सानप, सपोउपनि शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आणि संतोष सुपेकर यांनी केली.
Inter-state house-breaking gang busted