अग्रलेख

संभ्रम दूर करा

बारामतीत 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अपघाताविषयी अनेकदा संशय व्यक्त केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अनेकदा संशय व्यक्त केलेला आहे. अपघातग्रस्त विमानाची कंपनी असलेल्या व्हीएसआरला कोणीतरी वाचवत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी पूर्वीच केला होता. व्हीएसआरशी कोणाचा आणि कसा संबंध आहे, याचा शोध रोहित पवार घेत आहेत, असे मफलर मॅनवरून दिसते. मुंबईत 13 ते 14 नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर परिसरात मफलर मॅन पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर मफलरची प्रतिमा दाखवण्यात आली होती. त्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागील दोषींना वाचवणारा मफलरवाला नेता कोण, असा सवाल विचारण्यात आला होता. 13 नोव्हेंबरच्या रात्रीपासून मुंबईत पोस्टर्स
चर्चेत आले आणि 14 नोव्हेंबरला पुण्यातही असेच पोस्टर्स झळकले. मफलर मॅन कोण, हा प्रश्न चर्चिला जात होता. कोणत्याही राजकीय नेत्याचा थेट चेहरा न दाखवता केवळ एका मफलरची प्रतिकृती किंवा मफलर घातलेल्या व्यक्तीची छायाकृती दाखवण्यात आली होती. अजित पवार यांच्या विमान अपघातातील दोषींना वाचवणारा तो मफलरवाला नेता कोण, असा सवाल या पोस्टर्समधून विचारण्यात आला होता. पोस्टर्सवर 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता या मफलर मॅनचा खुलासा होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. रोहित पवार यांनी त्यानुसार 16 नोव्हेंबर 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवत तेच मफलर मॅन असल्याचा आणि तेच व्हीएसआर कंपनीला वाचवत असल्याचा आरोप केला. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. याच दिवशी दुपारी 4 वाजता रोहित पवार यांनी मफलर मॅनचा खुलासा केला. मी स्वतःच्या काकांना न्याय देऊ शकत नसेन आणि या प्रकरणात तडजोड करत असेन तर सामान्य नागरिकाला न्याय कसा देणार हे सर्व समोर आल्यानंतर मला कदाचित राजकीय परिणामांना सामोरे जावे लागेल. मात्र, मला त्याची चिंता नाही, असे विधान रोहित पवारांनी केले. मी ज्या व्यक्तीचे नाव घेत आहे ती व्यक्ती अजितदादांच्या अपघातामागे आहे, असे मी म्हणत नाही; मात्र या प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात आलेल्या कंपनीला ही व्यक्ती नक्कीच वाचवत आहे, असेही त्यांनी म्हटले. 21 नोव्हेंबर 2024 रोजी जयपूर येथे व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचे पुत्र रोहित सिंग यांच्या विवाहसोहळ्याला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळचा फडणवीस यांचा व्ही. के. सिंग यांच्यासोबतचा मफलर घातलेला फोटो रोहित पवार यांनी दाखवला. लग्नाला उपस्थित राहिल्यावरून फडणवीस हेच त्या विमान कंपनीला वाचवू पाहत आहेत, असे रोहित पवार यांनी गृहीत धरले असल्याचे स्पष्टपणे दिसते. व्हीएसआर आणि व्ही. के. सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली. या सरकारने व्ही. के.सिंग आणि त्यांच्या कंपनीला जरी वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचे सरकार आले तर त्यांना सोडणार नाही. त्यांचा हा पुतण्या कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अर्थात, सत्ता येण्याचा प्रश्न आहे. यापूर्वी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते ते आजही कायम आहेत. अपघातप्रकरणी एफआयआर दाखल का करण्यात आलेला नाही, हा त्यांचा प्रश्न कायम आहे, अशी त्यांनी टीका केली. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी पुण्यात अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना विमान अपघाताच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. विमान अपघाताबाबत जनमानसात कोणताही संभ्रम राहू नये यासाठी या प्रकरणाचा सखोल तपास करून अहवाल लवकरात लवकर समोर आणावा, अशी विनंती फडणवीस यांनी व्यासपीठावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली. हा केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळे कारण होते, याबाबत स्पष्टता येणे गरजेचे असून, कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. अमित शहा यांनीही हातपास वेगवान करण्याचे आश्वासन दिले असल्याचे फडणवीस यांनी नंतर सांगितले. या दुर्घटनेला आठ ते दहा महिने उलटून गेले असल्याने जर यात कोणी दोषी आढळले तर त्यांना फासावर लटकवले पाहिजे आणि जर हा केवळ अपघात असेल तर जनतेच्या मनातील आक्रोशाला शांती मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दादांच्या जाण्याचा चटका तर आपल्या सगळ्यांच्या मनाला लागला आहेच; पण त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये जनमानसाच्या मनामध्ये दादांच्या जाण्यानंतर काही प्रश्नचिन्हदेखील निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने चर्चादेखील झाल्या आहेत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला असे वाटते की, हे जे काही घडले ते नेमके काय आहे? हा अपघात आहे की पाठीमागे काही घडले आहे हे स्पष्ट व्हावे. महाराष्ट्रातल्या सामान्य व्यक्तीच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे. याबाबतीतला जो काही अहवाल आहे तो लवकरात लवकर आला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले. पुतळ्याच्या अनावरणापूर्वी पोस्टर्सची चर्चा सर्वत्र होत होती. त्याच अनुषंगाने फडणवीस यांनी भाषण केले असेल तर तसे म्हणता येते. संभ्रम दूर झाला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहेच तर केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांनी रोहित पवार यांच्यासह लोकांच्या मनांतील संभ्रम दूर केला पाहिजे. अजित पवार यांच्या विमान प्रवासाबाबत ऐनवेळी झालेले बदल, काही नेत्यांच्या भेटीसाठी त्यांना थांबावे लागणे, विमानाचा रन-वे बदलला, विमान कमी उंचीवर आले, या मुद्द्यांचा तपास यंत्रणा विचार करत नसल्याचे मुद्दे रोहित पवार यांनी उपस्थित केले. विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला आणि तो पुन्हा मिळवता येणार नसल्याचे स्वीकारण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. सरकार कोणताही एफआयआर दाखल करत नसल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी हे सारे मुद्दे यापूर्वीच उपस्थित केलेले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारांवर आहे. अपघातामागील सत्य समोर आले पाहिजे, असे मुख्यमंत्रीही म्हणत आहेत. रोहित पवार यांचीही तीच मागणी आहे.

Clear up the confusion

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

एक होती सुखद वनराई

- सुजाता येवले फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना…

6 hours ago

अनोळखी झालेली माणसं!

- अफजल पठाण कधीकाळी ज्यांच्याशिवाय दिवस सरत नव्हता, आज त्यांच्याशी बोलण्यासाठीही वेळ मागावा लागतो. एक…

7 hours ago

जलसंकटाची चाहूल : सामूहिक जबाबदारीचे भान

पाणी हेच जीवन आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु, आज हेच जीवन संकटात…

7 hours ago

आयुष्याची घडी

रोजच्या जगण्यातलं ‘कपडे वाळत घालणं’ हे दिसायला अत्यंत साधं वाटणारं काम, पण या एका साध्या…

7 hours ago

हरवत चाललेली नात्यांची श्रीमंती!

घरं मोठी झाली, पण मनं छोटी कपडो की मॅचिंग बिठाने से सिर्फ शरीर सुंदर दिखेगा...…

8 hours ago

नाशिकमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा रुग्णांचे हाल

रक्तदान शिबिरांचे आयोजन करा नाशिक : प्रतिनिधी शहरात सध्या सण-उत्सवांचा काळ, महाविद्यालयांच्या सुट्ट्या आणि डेंग्यू,…

8 hours ago