ढगफुटी टळली; अतिवृष्टीने झोडपले

24 तासांत शहरात 107.3 मिलिमीटर पावसाची नोंद

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने मंगळवारी (दि. 7) ढगफुटीसह अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, सुदैवाने ढगफुटीचे केंद्र उत्तर दिशेला सुरत व दक्षिण दिशेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेच्या दिशेने सरकल्याने नाशिकवरचे ढगफुटीचे संकट टळले. ढगफुटी झाली नसली, तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे.
शहरात गेल्या 24 तासांत 107.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, नाशिक तालुका, पेठ व दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या निर्देशानुसार, प्रशासनाकडून सुरक्षेचा उपाय म्हणून शाळा, मंदिर, पर्यटनस्थळे बंद ठेवली होती. त्यामुळे मंगळवारी शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी होती. अत्यावश्यक सेवा, सरकारी व खासगी आस्थापने वगळता मुख्य बाजारपेठा, हॉटेल्स, दुकाने बंद असल्याचे चित्र होते.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार नाशिक शहरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र, सकाळी 10 नंतर पावसाचा वेग काही अंशी मंदावल्याचे चित्र होते. नाशिक शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण समूहातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला नसला, तरी गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहनधारक व पादचार्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

हुल्लडबाजांना पोलिसांचा चोप
गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्यावर पात्रात पुलावरून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. पावसाचा धोका लक्षात घेत प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतरही अनेक तरुण गोदावरीच्या पात्रालगत गर्दी करताना दिसले.

Cloudburst averted; lashed by torrential rain.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *