मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
अरबी समुद्रावर बनत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या बर्याचशा भागात मंगळवारी, दि. 7 जुलै रोजी ढगफुटीसदृश पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बर्यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुमारे 300 मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. कुठेही जीवितहानी होणार नाही, याबाबतही दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले
आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवण्याचे आदेश त्यांनी या आढावा बैठकीत दिले. अत्यावश्यक असल्याशिवाय नागरिकांनी आज घराबाहेर पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जाणे टाळावे!
नाशिकमधील हवामान अंदाज लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. बंद होऊ शकणारे रस्ते, दरडी कोसळण्याची ठिकाणी अशा सर्वंकष बाबींचा विचार करून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पर्यटकांनी जावू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून संकटस्थिती उद्भवल्यास, अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. पुढील 48 तास ‘शून्य बळी’ हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Cloudburst-like rain in Nashik district today.