सोशल मीडियावर मीम्सची जोरदार चर्चा
नाशिक : वाहिद बागवान
’स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणार्या नाशिक शहरात सध्या एका आगळ्यावेगळ्या ’पक्षा’ची जोरदार चर्चा रंगली आहे. हा पक्ष कोणत्याही निवडणुका लढवण्यासाठी नाही, तर प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी मैदानात उतरला आहे. ’कॉकरोच जनता पार्टी’ असे या सोशल मीडियावरील नव्या ट्रेंडचे नाव असून, त्यांनी नाशिकमधील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेच्या समस्येवर मीम्सच्या माध्यमातून चौफेर फटकेबाजी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ’कॉकरोच जनता पार्टी’ नावाने एका व्यंग्यात्मक मोहिमेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील विदारक परिस्थिती आणि प्रलंबित नागरी समस्यांकडे नाशिक महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी तरुणाईने या कल्पक मार्गाचा अवलंब केला आहे.
राजकीय पक्षांची खोटी आश्वासने आणि शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती यातील तफावत दाखवण्यासाठी ’कॉकरोच’ (झुरळ) हे प्रतीक म्हणून वापरले गेले आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत तग धरून राहण्याची क्षमता कॉकरोचमध्ये असते, अगदी खड्ड्यांतून आणि ट्रॅफिकमधून रोज प्रवास करणार्या नाशिककरांसारखीच! असा उपरोधिक संदेश यातून दिला जात आहे.
नागरिकांचा प्रतिसाद
सध्या नाशिककरांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर याच मीम्सचा पाऊस पडत आहे. रोजच्या ट्रॅफिक आणि खड्ड्यांना वैतागलेले सर्वसामान्य नागरिक हे मीम्स मोठ्या प्रमाणावर शेअर करून आपला रोष व्यक्त करत आहेत.
वाहतूक कोंडी आणि मोकाट जनावरे
द्वारका सर्कल, सीबीएस आणि सिडको परिसरातील रोजचे ट्रॅफिक तसेच रस्त्याच्या मधोमध बसणारी मोकाट जनावरे यावरही या पेजने आपल्या मीम्समधून निशाणा साधला आहे.
कचरा आणि गोदावरीचे प्रदूषण
गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण आणि शहरातील कचराकुंड्यांच्या आजूबाजूला साचलेला कचरा यावर लक्ष वेधण्यासाठी ’आमचा जाहीरनामा : प्रत्येक चौकात मोफत कचरा’ असे मीम्स लक्ष वेधून घेत आहेत.
मीम्सच्या माध्यमातून वेधले लक्ष
’कॉकरोच जनता पार्टी’ने नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांंवर अचूक बोट ठेवले आहे: खड्ड्यांचे साम्राज्य : नाशिकमध्ये खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा? अशा आशयाचे मीम्स सध्या सर्वाधिक व्हायरल होत आहे. त्र्यंबकरोड, पाथर्डी फाटा आणि पंचवटी परिसरातील रस्त्यांची झालेली चाळण यावर सडकून टीका करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीचा फज्जा
स्मार्ट सिटीच्या नावाखाली वर्षानुवर्षे संथगतीने चाललेली कामे आणि त्यामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप यावरही मार्मिक भाष्य करण्यात आले आहे.
‘Cockroach Party’ attacks Nashik’s problems