नात्यांची बांधिलकी

कुठलेही नातेसंबंध केवळ प्रेमावर आधारित नसतात, तर त्यासाठी परस्पर सन्मान किंवा आदर अधिक महत्त्वाचा आहे.
कुठलेही नातेसंबंध केवळ प्रेमावर आधारित नसतात, तर त्यासाठी परस्पर सन्मान किंवा आदर अधिक महत्त्वाचा आहे. एकमेकांसाठी असलेला आदर टिकून राहिला तर नाते दीर्घकाळ टिकते आणि समृद्ध होते. मग ते नाते कुठलेही असो. आई-वडील आणि मुलगा-मुलगी, नवरा-बायको, सासू-सून, बहीण-भाऊ, शेजारी किंवा मित्र-मैत्रिणी. परस्परांविषयीच्या आदरामुळे नात्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. संबंध मजबूत होतात. संवाद सुधारतो. संघर्ष कमी होतो आणि एकंदरीतच नातेसंबंध सशक्त होतात. प्रेम आणि सन्मानामध्ये फरक सांगायचा झाला तर प्रेम ही एक भावना आहे तर सन्मान ही एक कृती आहे. कुठल्याही नात्याचा खरा पाया म्हणजे परस्परसन्मान. त्यामुळे कोणतेही नाते टिकवायचे असेल तर प्रेमाबरोबरच किंवा त्यापेक्षा अधिक, एकमेकांच्या मतांचा, निर्णयांचा, आवडीनिवडींचा, विचारांचा आणि त्या व्यक्तीचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
इतरांचा आदर कसा राखावा?
कोणालाही कमी लेखू नका : कोणाचाही त्यांच्या रूपावरून, आर्थिक, परिस्थितीवरून किंवा शिक्षणावरून अपमान करू नका.
वेगळ्या मतांचा आदर करा : प्रत्येकाची विचारसरणी, त्यांना आलेले अनुभव वेगळे असतात. त्यातून तयार झालेली मते वेगळी असू शकतात. त्यामुळे इतर मतांचाही आदर करा आणि त्यांना समजून घेण्याचा
प्रयत्न करा.
इतरांच्या भावनांची कदर करा : समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा. अगदी एखाद्या व्यक्तीने नकार दिला, तरी तो स्वीकारण्याची मानसिकता ठेवा.
कोणाच्याही स्वातंत्र्यावर मर्यादा आणू नका. प्रत्येक व्यक्तीला
स्वतःचे निर्णय घेण्याचा हक्क असतो, त्याचा सन्मान करा.
आदरपूर्वक बोला : कोणालाही टोमणे मारणे किंवा अपमानास्पद बोलणे टाळा. शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते याची जाणीव ठेवा. त्यामुळे आपले शब्द विचारपूर्वक वापरा.
मैत्रिणींनो, आदर, सन्मान फक्त दुसर्‍याचा करायचा नसून, आत्ममसन्मान ठेवणे तितकेच
महत्त्वाचे आहे.
स्वतःचा आदर कसा राखाल?
स्वतःच्या गरजा ओळखा आणि त्या पूर्ण करा. फक्त इतरांसाठीच नाही, तर स्वतःसाठीही वेळ काढा. स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजा ओळखा आणि त्यांना महत्त्व द्या.
स्वतः निर्णय घ्यायला शिका आणि या निर्णयांवर विश्वास ठेवा. समाजाच्या, इतरांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका.
स्वतःला कमी लेखू नका. तुमची स्वतःची किंमत ओळखा. तुमच्या गुणांची आणि प्रयत्नांची जाण ठेवा. तुम्ही स्वतः स्वतःचा आदर करा आणि इतर कोणालाही तुमचा अनादर करू देऊ नका.
नकार द्यायला शिका : मला जे अयोग्य वाटते अथवा एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला शारीरिक, मानसिक किंवा भावनिक अडचण होणार असेल तर त्याला ठामपणे नकार द्यायला शिका.
स्वतःला वेळ द्या आणि स्वतःच्या विकासाला प्राधान्य द्या. नवीन कौशल्य शिकणे, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासणे, ज्ञान वाढवणे, या गोष्टींसाठी ठरवून वेळ काढा. या सर्व गोष्टींमुळे तुमचा आत्मसन्मान वाढायला
मदत होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *