(भाग 2)
शाळेत जाण्यास कोणी अळंटळं केल्यास ’मज आवडते बहु माझी शाळा लावला तिने मजला लळा’ असे पालुपद म्हणत शाळेची तयारी करून देत असे. संध्याकाळी सातच्या आत घरात येण्याचा शिरस्ता होता. जेवण करून सर्व आवरून आबालवृद्ध घरातलीच काय पण गल्लीतले देखील रात्री नऊ वाजेपर्यंत झोपलेले असायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा लग्नकार्यात सर्व आते-मामे भावंडं जमल्यानंतर गप्पाष्टकं जमली किंवा कार्याच्या तयारीसाठी रात्री उशिरापर्यंत महिला जाग्या असल्या तर आजोबांच्या काठीच्या आवाजासोबत आजोबांचा धीर गंभीर आवाजही येत असे, ’बाळांनो रात्र झोपण्यासाठी असते!’ असंख्य अशा समय सुचकतेच्या गोष्टी आहे ज्या अंगवळणीही पडलेल्या आहेत. उदाहरणार्थ दुपारनंतर अंधार पडल्यावर केस विंचरू नये रात्रीच्या जेवणात कोणाच्या ताटात येण्याची शक्यता असायची. अंधारातच बायकांची न्हाणी धुणी आटोपली पाहिजे. काही विशिष्ट शरीराला व्यायाम घडवणारी कामे पहाटे किंवा सकाळीच असत. आज सुद्धा पहाटे उठून केलेले व्यायाम दिवसभर तनामनाला ऊर्जा देत असतात. रोजच देवापुढे निदान पाच मिनिटे ध्यान लावून बसले पाहिजे. आरतीच्या वेळी सगळ्यांनी हजर असलेच पाहिजे. चपला अंगणात दाराच्या ओट्याखालीच काढल्या पाहिजे. असंख्य कॉमनसेन्सच्या गोष्टी आता लोप पावत चालल्या आहेत. आजी-आजोबांचा मनात प्रचंड अभिमान आहे. वाईट एकाच गोष्टीचे वाटते दोघांचाही सहवास मला लाभला नाही. देवाला आवर्जून सांगावेसे वाटते आजच्या या पिढीसाठी माझे आजी-आजोबा हवे होते. ई-जमाना आलाय; आजकाल आजी-आजोबांच्याच हातचा रिमोट सुटत नाही, त्यांची पिढी जास्त टेक्नोसॅव्ही झाली आहे. नातवंडांकडून का अपेक्षा करतात? सासु सुना नणंद भावजया अगदी बहिणी सुद्धा प्रेमाने गप्पा मारण्यापेक्षा तिरकस बोलणे, टोमणे यांना जास्त प्राधान्य देताना दिसतात. मुलांकडून का अपेक्षा करावी? प्रवासाने जग जवळ येत चालले म्हणे! सून घरात आल्याबरोबर आयुष्यभर चार भिंतीत कष्ट करत काढले(?) म्हणून सासू प्रवासाला निघते आणि सुनेच्या मुलाच्या प्रत्येक प्रवासातही कबाब मे हड्डी आवर्जून बनून त्यांच्याबरोबर सगळीकडे सुटते. सुनेच्या कुठल्याही गरजेच्या वेळी सासू आवर्जून जबाबदारी झटकते मग सुनेकडून का अपेक्षा? आपली आई स्वतःच्या सासूशी कशी वागते हे बघत सासरी आलेल्या मुलीला घरात सासू, नणंद, दीर सारेच नको वाटतात. अगदी सासरचे लोक नको म्हणून माहेरचेही नको. हा वाईट अर्थाचा कॉमनसेन्स बोकाळत चालला आहे. लग्नाळू मुलींसाठी मुलं बघतानाच सासू म्हणजे डस्टबिन, तर नणंद, दीर म्हणजे फ्रेम म्हणून हिणवत सर्रास स्थळे नाकारली जातात. माझ्या माहितीत एके ठिकाणी रूपसुंदरी (तिच्या स्वतःच्या दृष्टीने हो) मुलगी जोपर्यंत जॉबला नव्हती तोपर्यंत आई स्थळे नाकारायची आता जॉब लागलाय तर मुलगी नाकारतेय. हसावे की रडावे तेच कळत नाही. मुलीचा संसार स्वतःच्या मर्जीने चालवण्यासाठी आई हुंड्यात आल्यासारखी मुलीच्या सासरी तळ ठोकून असते. किंवा मोबाईलचा वापर करून मुलीच्या संसाराची बित्तंबातमी काढत नको इतकी हस्तक्षेप करते. वयात आल्याबरोबर मुलांनाही आईबाप का जड होतात? तेच कळत नाही.
बर्याच ठिकाणी लग्न झाल्यावर स्वतःच्या घरच्या जबाबदार्या टाळत सासुरवाडीच्या जबाबदार्यांना प्राधान्य देतांना दिसतात. शिक्षण करियर प्रोजेक्ट टार्गेट्सच्या नादात आई-वडील नातलग मुलेबाळे यांच्यासोबत जगणंच राहून जातं. पुढची पिढी संस्कारशील घडावी असे जर वाटत असेल तर मुळातच आई-वडील आजी आजोबा आणि इतर नातलग, सुह्दांनी सुद्धा कॉमन सेन्स वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या समोर नातलगांविषयी उखाळ्या पाखाळ्या काढणे, सतत दुसर्याची खिल्ली उडवणे, दुसर्यांचे दोष काढणे, असेच ठेवले तर पुढची पिढीही तशीच बनेल हा कॉमनसेन्स हवाच. टीव्हीवरील फुटकळ सिरीयल बघण्यापेक्षा बातम्या त्याही योग्य त्याच, प्रेरणा स्फूर्ती देणार्या, योग्य शिक्षण देणारे सिनेमे बघितल्यास जगात योग्य काय याचा कॉमनसेन्स मुलांना नक्कीच येईल.
आजी, आजोबा, आई, बाबा यांसोबत लहान मुले वयात आलेली मुलेही टीव्ही बघतात. प्रत्येक अर्ध्या तासाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान निदान दहा जाहिराती असतातच. जाहिरातींमध्ये शेव्हिंग क्रीम्स, कंडोम्स, सॅनिटरी पॅड, अंतर्वस्त्र, तंबाखू, गुटखा, बार या जाहिरातींचा यथेच्छ आणि गलिच्छ मारा असतो. काय दाखवावे याची लाज टीव्हीवाल्यांना, आणि निर्मात्यांनातर नाहीच नाही. विशेष म्हणजे जाहिरात करणारे जे
स्वतःला तरुणाईचा आदर्श मानतात ते सगळाच कॉमनसेन्स आणि लाज लज्जा विकून खाल्ल्यासारखा गलिच्छ आदर्श समाजापुढे उभा करतात. मुलांचे अडनिडे वय असते. पण आई-वडिलांनीच अशावेळेला कॉमनन्सेन्स वापरून टीव्ही बंद करायला हवा. सायबर क्राइम डिपार्टमेंटचेही लक्ष जाईल तर बरे. मोबाईल मुलांच्या हातात फक्त गरजेपुरता जाईल एवढा विचार करायला हवा. त्याआधी आपणच
स्वतःवर बंधने घालायला हवीत. मॉडर्नायजेशनच्या नावाखाली अर्ध्या कपड्यांमध्ये वावरणारे आई-वडील बघून मुलांची पौगंडावस्था संख्या रेषेच्या ऋण दिशेकडे झुकताना दिसत आहे. अंगाखांद्यावर पदर घेऊन वावरणार्या आया, आज्या आणि धोतर, पगडी, टोपीमध्ये वावरलेल्या काका, मामा, वडील, आजोबा यांना बघत बघत सुंदर निरामय संस्कार लाभलेले हे आई-वडील कधी इंग्रजाळले समजलेच नाही. असंख्य कारणांपैकी हे पण एक कारण इथे चार वर्षांची बालिकादेखील सुरक्षित नाही,’ घरात मुलांसमोर कसे वावरावे, कसे बोलावे याचा कॉमनसेन्स पालकांनाच हवा. मुलांना परदेशात पाठवण्याची स्वप्ने बघणार्या आणि तसा हट्टही धरणार्या पालकांना त्यांच्या येऊ घातलेल्या वृद्धत्वाचा कॉमनसेन्स हवाच. नंतर मुले परदेशात स्थिरावल्यावर आणि तिथल्या शिस्तीची आणि चकाचौंध दुनियेला चटावल्यावर मायदेशात परत न आल्यास वृद्धत्वाविषयी आणि मूलांच्या वागण्याविषयी अश्रू, उसासे वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या वृद्धपणात आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावे, काळजी घ्यावी असे वाटत असेल तर आधी पालकांनी त्यांच्या वृद्ध पालकांशी संवाद आणि प्रेमाने वागण्याचा कॉमनसेन्स वापरायला हवा. भावजईने वृद्ध आजारी आई-वडिलांची खाली मान घालून ’ब्र’ शब्दही न बोलता रात्रंदिवस सेवा करावी असे वाटत असेल तर आपणही सासू-सासर्यांना ’आम्ही बस म्हणता बसायचं उठ म्हटल्यावरच उठायचं’ ’आमच्या आयुष्यात इंटरफिअर करू नका’ ’आमचे आयुष्य आम्हाला जगु दया’ असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे! किंवा घरातील वृद्ध आजारी असताना किंवा अॅडमिट असताना उठसूट गावाला फिरू नये, पिकनिकला जाऊ नये, हा कॉमनसेन्स हवाच. शाळकरी मुलांना बॉलिवूडच्या बीभत्स गाण्यांवर चेहरा आणि इतर शरीरातील अवयव पिक्चरमधल्या असंस्कृत हीरो-हिरॉइनसारखे हलवत तसेच किळसवाणे विभ्रम दाखवत नाचवण्यापेक्षा उत्तम सुसंस्कृत सुशिक्षित नागरिक बनवण्याबद्दलचा कॉमनसेन्स संपूर्ण समाजालाच हवा. आपल्या मुलांना शेजारच्या कुटुंबाचा लळा लावतांना तो आपल्या सोयीने, गरजेपुरता स्वार्थापोटी शेजारच्यांना गृहित धरत लावल्यास शेजारी कॉमनसेन्स वापरत संबंधच तोडतील, शेजार धर्माला फुलस्टॉप लागेल. शेजारच्या घरात काय चालले… वगैरे बघण्यापेक्षा माझ्या घरात काय चालले? माझे घर सुसंस्कृत कसे होईल! माझ्या घरातल्या व्यक्ती भारत देशाच्या सुजाण सुसंस्कृत कर्तव्यनिष्ठ नागरिक कसे बनतील याकडे बघण्याचा कॉमनसेन्स प्रत्येकाने ठेवला तर भारतभू परत एकदा ’सुजलाम् सुफलाम् सोन्याची खाण’ बनण्यासाठी खूप कमी कालावधी लागेल. प्रोफेशन कुठला का असेना डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योग, व्यापार अगदी राजकारणी सुद्धा सगळ्यांमध्ये प्रामाणिकपणाचा कॉमनसेन्स असेल तर भ्रष्टाचार, चोरी, दरोडेखोरी, बेकारी सगळ्यालाच आपोआप आळा बसेल. राजकारण हा व्यवसाय न बनवता निरामय समाजसेवेची सुसंधी समजल्यास आणि त्याप्रमाणे आचरण केल्यास निरामय भारतभूची पुनश्चनिर्मिती होईल.
परस्त्री मातेसमान, तरुणी भगिनीसमान बालिका पुत्रीसमान हा कॉमन सेन्स वापरला तर समाजात स्त्री निर्भयपणे वावरू शकेल. बलात्कार, छेडाछेडी शब्द शब्दकोशाच्याच कायमचे बाहेर पडतील. परत एकदा शिवराज्य येईल. जाता जाता सरकारने कॉमन सेन्स वापरून शिक्षकांना फक्त पूज्य, पावन असे विद्यादानाचेच काम दिले तर भारताला ’अच्छे दिन’ लवकरच येतील.
commonsense
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…