अधिग्रहित जमिनींचा मोबदला लवकरच : मुख्यमंत्री

मखमलाबादच्या जिरायती जमिनींना बागायती दर्जा

पंचवटी : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम व रिंगरोड भूसंपादनासंदर्भातील शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आमदार राहुल ढिकले व आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत 24 वर्षांपूर्वी कुंभमेळ्यासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनींचा मोबदला देण्यासह मखमलाबाद येथील जिरायती जमिनींना विशेष बाब म्हणून बागायती दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले.
सन 2002 च्या कुंभमेळ्यावेळी नांदूरनाका-जत्रा हॉटेल लिंकरोड व संभाजीनगर महामार्ग रुंदीकरणासाठी शेतकर्‍यांनी स्वेच्छेने जमीन दिली होती. मात्र, अद्याप मोबदला न मिळाल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावर संबंधित शेतकर्‍यांना तातडीने मोबदला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मखमलाबाद परिसरातील अनेक बागायती जमिनी महसूल नोंदीत जिरायती दाखविल्या गेल्याने नुकसान होत असल्याची तक्रारही करण्यात आली. मागील दहा वर्षांत बागायती पीक नोंद किंवा जलसमृद्धता असल्यास अशा जमिनींना बागायती दर्जा देण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले. नांदूर-दसक, नांदूर-मानूर व आडगाव परिसरातील साधुग्रामसाठीच्या जमिनींच्या मोबदल्यातील तफावतही बैठकीत मांडण्यात आली. शासकीय दरापेक्षा कमी दराने मूल्यांकन झाल्याची बाब लक्षात आणून देत फेरमूल्यांकनाची मागणी करण्यात आली. यावर योग्य दरानुसार पुनर्मूल्यांकन करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
आडगाव परिसरातील हायटेन्शन वीजवाहिन्या व टॉवर डीपी रोडलगतच्या पडीक जमिनीत स्थलांतरित करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच पंचक परिसरातील प्रस्तावित उड्डाणपुलावर चढ-उतारासाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. बैठकीला माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, नगरसेवक रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, सुरेश खेताडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

साधुग्रामच्या दरातील तफावत दूर होणार..

नांदूर-दसक व नांदूर-मानूर परिसरात साधुग्रामसाठी ना विकास क्षेत्र घोषित करण्यात आले असून, येथील रेडीरेकनरचा दर कमी आहे. याच ठिकाणी रस्त्यालगत दुसरे क्षेत्र असून, या ठिकाणी रेडीरेकनरचा दर जादा आहे. त्यामुळे दरातील तफावत दूर करण्याची मागणी करण्यात आली. नांदूर-दसक व आडगाव परिसरातील अधिग्रहित होणार्‍या जमिनींचे शासकीय व चालू बाजारभावानुसार तातडीने फेरमूल्यांकन करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असेही स्पष्ट केले.

ओव्हरहेड हाय टेन्शन लाइन्स व टावर स्थलांतरित होणार

आडगाव परिसरामध्ये सुपीक व बागायती शेती मोठ्या प्रमाणामध्ये असून, या ठिकाणी सुरत-चेन्नई हायवे तसेच रिंगरोडच्या बाजूने अतिउच्च दाब विद्युत वाहिनी किंबहुणा हाय टेन्शन लाइन तसेच महावितरणचे टावर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्र नापीक होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेता डीपी रोडच्या लगतच्या जागेमधून अशा विद्युत वाहिन्या तसेच टावर स्थलांतरित करावे, अशी मागणीदेखील करण्यात आली.

Compensation for acquired lands soon: Chief Minister

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *