सिंहस्थ ध्वजस्तंभ शिलान्यास सोहळा
पंचवटी : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवार, दि. 11 जून 2026 रोजी नाशिकमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ना. गिरीश महाजन आणि जगद्गुरू श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडणार आहे.
हा मुख्य सोहळा सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार असून, गोदाघाटावरील जुने भाजी पटांगण येथे पूजनीय महाराजांचे प्रवचन व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने आज पहाटे 5 वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत रामकुंड, गंगाघाट आणि जुने भाजी पटांगण परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, अनेक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
हे मार्ग वाहनांसाठी पूर्णपणे प्रवेश बंद
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता आज पहाटे 5 वाजेपासून खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास सक्त मनाई असेल ः
* मालेगाव स्टँडकडून रामकुंड ते पुढे म्हसोबा पटांगणकडे जाणारा व येणारा मार्ग.
* ढिकले वाचनालयाकडून रामकुंड ते पुढे म्हसोबा पटांगणाकडे जाणारा व येणारा मार्ग.
* खांदवे सभागृहाकडून ते रामकुंडकडे येणारा व जाणारा मार्ग.
* शनी चौकाकडून रामकुंडकडे येणारा व जाणारा मार्ग.
* नागेश्वर मंदिराच्या मागील बाजूकडून रामकुंडकडे येणारा व जाणारा मार्ग.
* काट्या मारुती चौकाकडून काळाराम मंदिर ते सरदार चौकाकडे येणारा व जाणारा मार्ग.
* शिवाजी चौकाकडून काळाराम मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग.
* काट्या मारुती चौक (गणेशवाडी) ते नेहरू चौकाकडे येणारा व जाणारा मार्ग.
* पंचवटी अमरधामकडून रामकुंडाकडे येणारा व जाणारा मार्ग.
* बाहेरून येणार्या भाविकांना आपली वाहने लावण्यासाठी प्रशासनाने खालील दोन जागा निश्चित केल्या आहेत. – रोकडोबा मैदान, कपूरथळा मैदान.
Major changes to traffic in Panchavati today.