कुंभमेळामंत्री गिरीश महाजन; आढावा बैठक
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध घाट, रस्ते तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि मार्च 2027 या विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक रविवारी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, जलसंपदाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मंत्री महाजन यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध घाटांच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. या कामांची अद्ययावत प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी, आवश्यक विभागीय समन्वय तसेच प्रलंबित बाबींचा आढावा मंत्री महाजन यांनी घेतला. ही कामे मार्च 2027 पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.
कामांच्या अनुषंगाने येणार्या अडचणी सोडवण्यासाठी विविध विभागांनी एकत्रित आणि समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. जलसंपदा, महसूल, भूमी अभिलेख, पोलिस, वन विभागाने त्यांच्याशी संबंधित बाबी एकत्रितपणे मार्गी लावून कामांना वेग द्यावा, असे मंत्री महाजन
यांनी सांगितले.
यावेळी गोदावरी नदीवरील उजव्या तीरावर गोदावरी-कपिला नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे, गोदावरी नदीवरील डाव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी-नंदिनी नदीच्या संगमाच्या खालील बाजूस घाट बांधणे, गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर ओढा येथे गणपती मंदिरालगत उर्ध्व व निम्न बाजूच्या लांबीत नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नानाकरिता ओढा राम घाट व परिसर विकसित करणे, दसक पुलाच्या उर्ध्व बाजूकडील दसक शिवारात उजव्या बाजूस घाट बांधणे व परिसर विकसित करणे, दसक पुलाच्या उर्ध्व बाजूकडील नांदूर शिवारात डाव्या बाजूस घाट बांधणे व परिसर विकसित करणे, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकिनारी (उजवा व डावा तीर) नवीन घाट बांधकाम व अनुषंगिक कामे, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रीत पाणीसाठे पूर्णपणे भरण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित राहण्यासाठी गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजनेची कामे आणि गोदावरी नदीवरील डाव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी-नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे तसेच गोदावरी नदीवरील उजव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी-नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे आणि गोदावरी नदीवरील नंदिनी संगम येथे रबर बंधारा बांधणे या कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री महाजन यांनी घेतला.
अधीक्षक अभियंता मिसाळ यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच विभागीय आयुक्त गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त खत्री यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती बैठकीत दिली.
यावेळी संबंधित प्रकल्पांशी निगडित सर्व भूसंपादन अधिकारी व संबंधित महसूल अधिकारी, संबंधित कार्यकारी अभियंते, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
Complete the work on the mountain passes before March.