कुंभमेळामंत्री गिरीश महाजन : गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ही संधी समजून जबाबदारीने काम करावे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण,
दर्जेदार तसेच विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने ‘अॅक्शन मोड’मध्ये कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने मंगळवारी (दि. 3) आयोजित करण्यात आलेल्या गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध अंमलबजावणी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे जागेची मर्यादा असल्याचे मंत्री महाजन यांनी नमूद केले. नाशिकमधील रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर येथील जागा मर्यादित असून, त्या तुलनेत भाविकांची संख्या चार ते पाच पटीने वाढणार आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनासह पायाभूत सुविधांचे सखोल व शिस्तबद्ध नियोजन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून, या निधीचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. देशभरातून तसेच जगभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी येणार असल्याने त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अत्यंत सुरेख, नियोजनबद्ध आणि सुयोग्यरीत्या पार पडल्याची भावना व्यक्त करावी, या दृष्टिकोनातून सर्व यंत्रणांनी आणि प्रत्येक अधिकार्यांनी जबाबदारीने कामे पार पाडावीत, असेही मंत्री महाजन म्हणाले.
या कार्यशाळेत बोलताना विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी गुणवत्ता नियंत्रण हे नियोजन आणि अंमलबजावणीचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या महाआयोजनासाठी तांत्रिक मानकांचे काटेकोर पालन, सातत्यपूर्ण देखरेख, तसेच सर्व यंत्रणांमधील समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिकमधील पावसाळ्याचा विचार करूनच कामांचे नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पावसाळ्याचा कालावधी व तीव्रता कामांच्या गुणवत्तेवर परिणाम करणार नाही, यासाठी अभियांत्रिकी नियोजन, साहित्य निवड व अंमलबजावणीचे वेळापत्रक हवामानाशी सुसंगत असावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत आयआयटी मुंबईचे डॉ. धर्मवीर सिंह यांनी बीटूमिनस तसेच काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामातील महत्त्वाच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. विकास ठाकर यांनी नागरी पायाभूत सुविधा समन्वय, पावसाळी पाणी व्यवस्थापन, कामांची गुणवत्ता व नियंत्रण याविषयी माहिती दिली. गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे अविनाश आठवले व वैभव भोसले यांनी आयएसओ 17020:2012 मानकांनुसार तपासणी, निरीक्षण व अहवाल प्रक्रियेचे सादरीकरण केले. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पीयूष पाटील यांनी विविध परवानग्या व ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…