सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर लॉजिंगद्वारे कायमस्वरूपी उत्पन्नाचा खटाटोप
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहराच्या हद्दीत काही हजार सेल्फ अटॅच्ड रूमचे बांधकाम सुरू आहे. घाऊक प्रमाण रूमबांधणीमध्ये साधू आखाडेदेखील आघाडीवर असल्याचे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात शासनाने निवासी खोल्या बांधून देण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने पहिल्या टप्प्यात प्रत्येक आखाड्याला एक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली. त्यानंतर दुसर्या टप्प्यात पुन्हा एक कोटी रुपये मंजूर करत प्रत्येकी 12 निवासी खोल्या बांधून देण्यासाठी निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर 13 मे 2026 रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी तीन कोटी रुपये प्रत्येक आखाड्यासाठी मंजूर केले. सिंहस्थ कुंभमेळ्यांंतर्गत प्रत्येक आखाड्याला पाच कोटी रुपये विकासकामांसाठी देण्यात येत आहेत. तिसर्या टप्प्यातील तीन कोटींबाबत आखाड्यांच्या साधू-महंतांचा विचार घेतला असता, बहुतेक आखाड्यांनी अटॅच्ड रूम बांधून देण्याचे सांगितले आहे. पहिल्या टप्प्यातील ध्वजस्तंभ, टॉयलेट ब्लॉक यांची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात प्लॉट विकत घेऊन त्यावर निवासी खोल्या म्हणजेच लॉजिंग बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. गावाकडची जमीनजुमला विकून अथवा कर्ज काढून प्लॉट घेऊन त्यावर निवासी खोल्यांची इमारत बांधणीला वेग आला आहे. जमेल तसे 5 ते 25 खोल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. लॉजिंग व्यवसायासाठी बांधकाम करताना त्यासाठी लागणारी जमीन वाणिज्य वापराची आहे की नाही? भूखंड बांधकाम परवानगी मिळवण्यास पात्र आहे की नाही? याची कोणतीही शहानिशा करण्यात येत नाही. विनापरवाना बांधकामांनी भविष्यात नागरी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीसाठी येणार्या निवासी भाविकांची संख्या मोठी आहे. अनेकदा त्यांना राहण्यास रूम मिळत नाहीत. त्यासाठी रूम बांधण्यावर भर देण्यात येत आहे. लॉजिंग बांधून ती चालवायला देण्याकडे कल असल्याचे दिसते.
त्र्यंबकेश्वर येथे लॉजिंग चालवायला घेणे, भाविकांना गाठून कमिशनवर रूम भरणे असे व्यवसाय जोरात सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत वापर झाल्यानंतर लॉजिंग म्हणून चालवायला देऊन कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे.
Construction of attached rooms accelerates in Trimbakeshwar