वीज कंपनीला ठेकेदारांनी सोडले वार्‍यावर

देखभाल-दुरुस्ती करणार्‍या एजन्सीचा मनमानी कारभार, शेतकरी हैराण

नांदगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वेहेळगाव वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हैराण झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट (कॉन्ट्रॅक्ट) घेतलेल्या एजन्सीने वेहेळगाव उपकेंद्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कंत्राटदार एजन्सीच्या या मनमानी कारभारामुळे 48 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहत असल्याने संतप्त शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खंडित विजेमुळे 13 गावे त्रस्त

वेहेळगाव कक्षांतर्गत आमोदे, बोराळे, मळगाव, वेहेळगाव, गिरणा डॅम, कळमदरी, जामदरी, पळाशी, सावरगाव, मंगळणे, तरवाडे, मूळडोंगरी यांसह 13 गावांना वीजपुरवठा केला जातो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी (मान्सूनपूर्व) वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित एजन्सीवर आहे. मात्र, वेहेळगाव कक्ष नांदगाव शहरापासून दूर आहे आणि आम्हाला वाहतुकीचा (ट्रान्स्पोर्ट) खर्च परवडत नाही, असे अजब कारण पुढे करत संबंधित एजन्सीकडून दुरुस्तीच्या कामात टाळाटाळ केली जात आहे.

‘महावितरण’चे कर्मचारीही हतबल
जर्जर झालेले खांब बदलणे आणि वीजवाहिन्यांमध्ये अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्या छाटणे ही कामे कंत्राटदाराने करणे बंधनकारक आहे. मात्र, ही एजन्सी कुठलेही सहकार्य करत नसल्याची खंत स्वतः वीज कंपनीच्या (महावितरण) कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी जीर्ण झालेले खांब आणि जमिनीच्या दिशेने लोंबकळणार्‍या तारा एकमेकांना घासून वारंवार बिघाड होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकर्‍यांना अंधारात राहावे लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या स्थानिक कर्मचार्‍यांना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे.

खांब पडल्याने 48 तास वीज गुल

वेहेळगाव कक्षांतर्गत येणार्‍या कळमदरी, मंगळणे आणि आमोदे फीडरवरील विजेचा खांब नुकत्याच झालेल्या वादळाने कोसळला. संबंधित कंत्राटदार एजन्सीने या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे 48 तासांपेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित होता. ऐन उन्हाळ्यात वेळेवर पिकांना पाणी न देता आल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वादळ व जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. काही ठिकाणी खांबही पडले आहेत. मी आणि माझे कर्मचारी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. परंतु, पडलेले किंवा मोडलेले खांब दुरुस्त करण्याची मुख्य जबाबदारी ज्या एजन्सीवर आहे, ते वारंवार फोन आणि मेसेज करूनही वेळेवर येत नाहीत. वेहेळगाव कक्षात पुरेसे खांब व साहित्य उपलब्ध नसल्याने उशीर होत आहे. या बेजबाबदार एजन्सीबाबत आम्ही वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे.
– संदीप मते, कनिष्ठ अभियंता, महावितरण, वेहेळगाव

Contractors left the power company in the lurch

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *