नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
येथील मुुक्तिधाम परिसरात कोयता गँगच्या माध्यमातून दहशत माजविणार्या तिघांविरोधात उपनगर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी झुलेलाल मंदिराजवळील ओंकार पॅटीस दुकानात किरकोळ कारणावरून तोडफोड व मारहाण करण्यात आली होती. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी एका युवकाने सँडविचची ऑर्डर दिली होती. तत्काळ पदार्थ न मिळाल्याने संतप्त झालेल्या युवकाने आपल्या साथीदारांना बोलावून दुकानात घुसून तोडफोड केली. यावेळी दुकानातील कर्मचारी हृतिक ओंकार कोरी यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी रोशन पोपट सोनवणे (वय 26), युवराज सदाशिव कुठे ऊर्फ बजरंग (23) आणि सलमान ऊर्फ सोनू शकील शेख (वय 24, सर्व रा. नाशिकरोड) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या तिघांची परिसरातून धिंड काढण्यात आली.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचे व्यापारी व नागरिकांनी स्वागत केले आहे. अशा कठोर कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मुक्तिधाम परिसरात सायंकाळी नियमित पोलिस गस्त वाढविण्याची मागणी व्यापार्यांनी केली आहे.
Crackdown on ‘Koyta Gang’; police parade them publicly.