कोट्यवधींच्या फसवणुकीचे जाळे उघडकीस, दोघा वकिलांसह टोळी जेरबंद
सिडको : प्रतिनिधी
बनावट व्यक्ती उभ्या करून, खोटी कागदपत्रे तयार करत दुसर्यांच्या मालकीचे भूखंड विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. इंदिरानगर पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात वकील कपिल अरविंद पाठक आणि वकील अलमास करीम सय्यद या ’बंटी और बबली’ दुकली वकिलासह 14 जणांचा सहभाग समोर आला आहे. दोन्ही वकिलांना भिवंडी येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीने आतापर्यंत नाशिक शहरात किमान पाच भूखंड व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याचा संशय आहे. कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनानगर आणि वडाळागाव परिसरातील दोन भूखंडांच्या व्यवहारांमधून हा प्रकार समोर आला. आरोपींनी सर्वप्रथम मूळ भूखंड मालकांच्या नावाने बनावट व्यक्ती उभ्या केल्या. त्यानंतर त्या व्यक्तींच्या आधार कार्डातील माहिती बदलून त्यावर मूळ मालकांचे नाव व पत्ता टाकण्यात आला. या बनावट आधार कार्डांच्या आधारे बँक खाती उघडण्यात आली. त्यानंतर संबंधित भूखंडांची नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे विक्री करण्यात आली. या व्यवहारांमुळे मूळ भूखंड मालकांना त्यांच्या मालमत्तेपासून वंचित राहावे लागले, तर भूखंड खरेदी करणार्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे या प्रकरणात दुहेरी फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी आरोपी बनावट सरकारी राजपत्र (गॅझेट) तयार करत होते. नाव बदलाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले राजपत्रच खोटे तयार करून त्याचा वापर शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी केला जात होता. त्यामुळे या टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा उघडकीस आल्यानंतर दोघे संशयित वकील नाशिकमधून फरार झाले होते. इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने त्यांचा माग काढत भिवंडी येथून त्यांना अटक केली.
पोलिसांच्या तपासात या टोळीने नाशिक शहरात यापूर्वीही अशाच प्रकारे किमान पाच गुन्हे केल्याचे समोर आले आहे. याशिवाय नाशिक आणि परिसरात आणखी काही भूखंड व्यवहारांमध्ये अशाच प्रकारची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी वकील कपिल पाठक, अलमास सय्यद, रितेश संसारे, घनश्याम गिल, शोभा मुकणे, भीमराव वाघमारे, मुकेश जाधव, रवींद्र अडांगळे, शरद गुठेकर, बासीद सय्यद, नईम सय्यद, करीम सय्यद, फिरोजा सय्यद आणि बाबूभाई मुलतानी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी काही आरोपींनी बनावट मालकांची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे करीत आहेत. ही कारवाई इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने केली. दरम्यान, अशाच प्रकारे भूखंड व्यवहारात फसवणूक झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांनी इंदिरानगर पोलिस ठाणे किंवा संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Sale of the plot while keeping the original landowners in the dark.