भुसावळ विभागाची आकस्मिक तपासणी; अधिक दर आकारणार्यांवर कारवाई
लासलगाव : वार्ताहर
रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात दर्जेदार खाद्यपदार्थ व पेये उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते तसेच अधिकृत विक्रेत्यांची नियमित आकस्मिक तपासणी सुरू केली आहे. निर्धारित कमाल किरकोळ किमतीपेक्षा अधिक दर आकारणे अथवा अन्य व्यावसायिक अनियमितता करणार्या विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे.
प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ तसेच पेयांसाठी एमआरपीपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी रेल्वे मदतच्या माध्यमातून प्राप्त होत असतात. या तक्रारींची दखल घेत तसेच प्रवाशांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विविध रेल्वे स्थानकांवर अचानक तपासण्या करण्यात येत आहेत.
तपासणीदरम्यान विक्रेता निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारताना किंवा अन्य व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, संबंधिताविरुद्ध रेल्वेच्या प्रचलित नियमांनुसार तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येते. आर्थिक दंडासोबतच प्रकरणाच्या स्वरूपानुसार इतर शिस्तभंगाची कारवाईही केली जाते. एप्रिल ते जुलै 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाने अशा व्यावसायिक अनियमिततांविरोधात केलेल्या कारवाईत संबंधित विक्रेत्यांकडून एकूण 7 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील खानपान विक्रेत्यांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाचा धाक निर्माण झाला आहे. प्रवाशांना योग्य दरात वस्तू व सेवा मिळाव्यात, त्यांच्या ग्राहक अधिकारांचे संरक्षण व्हावे आणि रेल्वे स्थानकांवरील खानपान सेवेतील पारदर्शकता कायम राहावी, यासाठी तपासणी प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यात
येणार आहे.
प्रवाशांनी तक्रार नोंदवावी
रेल्वेस्थानकावर किंवा रेल्वेगाडीत कोणत्याही खाद्यपदार्थ अथवा पेयासाठी निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष न करता रेल्वे मदतच्या माध्यमातून तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन मध्य रेल्वे, भुसावळ विभागाकडून करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे संबंधित विक्रेत्याची चौकशी करून नियमांनुसार कारवाई करणे शक्य होणार आहे.
Crackdown on railway catering vendors; fines exceeding ₹7 lakh imposed.