‘न्यू पंजाब बार’मध्ये गुन्हेगारी टोळीचा धुमाक

मामा राजवाडेसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
पंचवटी परिसरातील मालेगाव स्टॅण्ड येथील ‘न्यू पंजाब रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार’ येथे एका गुन्हेगारी टोळीने सातत्याने हप्ता वसुली, धमकी आणि मारहाणीच्या माध्यमातून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मामा राजवाडे याच्यासह 15 आरोपींचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रवीण सुकलाल कुमावत, बाबासाहेब शिवाजी बढे, राहुल मगनलाल जैन, प्रकाश पांडुरंग गवळी, योगेश हिम्मतराव पवार या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. या पाचही जणांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी व्यवसायाने रेस्टॉरंट/बार चालक असून, त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान आरोपींनी बारवर येऊन पन्नास हजार रुपये हप्ता मागितला. पैसे देण्यास नकार दिल्यावर, रेस्टॉरंट तोडण्याची आणि व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली. त्या रात्री आरोपींनी रेस्टॉरंटमध्ये येऊन
फुकट दारू मागितली. पुन्हा नकार दिल्यावर फिर्यादीचा रस्ता अडवून, जबरदस्तीने शटर बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी प्रकाश गवळी याने फिर्यादीचे हात पकडले, बाबासाहेब बढे याने छाती दाबून पकडत विनयभंगासारखे कृत्य केले, असे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर 25
फेब्रुवारी रोजी आरोपी धीरज शर्मा, अ‍ॅड. राहुल बागमार ऊर्फ राहुल जैन, आणि चैतन्य कावरे यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ केली. “हप्ता देत नाही,
फुकट पार्सल देत नाही, तुमचे हातपाय तोडून टाकतो,” अशा धमक्या देण्यात आल्या.
26 फेब्रुवारीला मामा राजवाडे याने मॅनेजर राहुल नंदन याला ऑफिसमध्ये बोलावून, लोखंडी रॉड आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मॅनेजरच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या टोळीच्या दहशतीमुळे फिर्यादीने आतापर्यंत पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र, आरोपींविरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर त्याला धीर आला आणि अखेर तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मामा राजवाडे, बाबासाहेब बढे, योगेश पवार, प्रकाश गवळी, विशाल देशमुख, संदीप पवार, लखन पवार, शरद पवार, प्रवीण कुमावत, धीरज शर्मा, राहुल बागमार ऊर्फ जैन, चैतन्य कावरे आणि 34 अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिरसाठ व पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *