तब्बल तीन वर्षांपासून होऊ दे खर्च करत करत निवडणुकीच्या घोषणेकडे डोळा लावून बसलेल्या इच्छुकांचा जीव महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्याने भांड्यात पडला. निवडणुकीची घोषणा होताच विविध पक्षांकडून सध्या मुलाखतींचा सिलसिला सुरू केला आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेत सक्षम उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. यंदा भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाला इच्छुकांचे प्राधान्य दिसत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता असल्याने मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडूनही अनेक जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसकडे उमेदवारांचा ओढा कमी दिसत आहे. मात्र, जितका इच्छुकांचा ओढा अधिक तितकाच बंडखोरीचा फटका अधिक बसण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांना बंडोबांना थंडोबा करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. नाहीतर याच बंडोबांनी निवडणुकीचे गणित बिघडवले तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. – अश्विनी पांडे
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका सुरू आहे. प्रभागनिहाय सामाजिक समीकरणे, उमेदवारांची प्रतिमा, संघटनात्मक ताकद, आर्थिक क्षमता आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क या सर्व बाबींचा कस लावत सक्षम उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. यंदा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांचा ओढा सर्वाधिक असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक महापालिकेसाठी भाजपकडून 1,200 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. सत्तेतील सहभाग, संघटनात्मक मजबुती आणि मागील काही निवडणुकांतील कामगिरी यामुळे भाजपकडे इच्छुकांची रांग लागली आहे. अनेक प्रभागांत एका जागेसाठी भाजपकडे दोन ते तीन नव्हे, तर दहा ते बारा इच्छुकांनीही अर्ज दाखल केल्याने पक्षश्रेष्ठींसमोर एकाला संधी आणि बाकीच्यांचे काय? असा पेच निर्माण होणार आहे. त्यात अजून उमेदवारी मिळेल की नाही, याची कोणतीच शाश्वती नसताना प्रचारपत्रकेही नागरिकांच्या दारात पोहोचली आहेत. काहींनी तर उमेदवारी मिळेल अशी शक्यता गृहीत धरून मतदारांना नमस्कार, चमत्कार दाखवायलाही सुरुवात केली आहे. अनेकांनी मतदान पक्के करण्यासाठी प्रभागातील नागरिकांना खाटू श्यामचे दर्शन घडविले, तर काहींनी मधमाशी उद्यानातही सैरसफाटा घडवून आणला आहे.
भाजपखालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांचे प्राधान्य दिसून येत आहे. सत्तेत थेट सहभाग असल्याने स्थानिक पातळीवर निवडणूक जिंकणे सोपे जाईल, असे गणित इच्छुकांकडून मांडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिवेसेना- भाजप युती झाली तर भाजपच्या सूक्ष्म पातळीवरील प्रचाराचा फायदा होईल, असे इच्छुकांचे गणित आहे. त्यामुळे भाजपनंतर सुरक्षित पर्याय म्हणून इच्छुक शिंदे गटाकडे कल दिसत आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांमुळे राजकीय समीकरणांना वेगळेच वळण मिळाले आहे. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युती झाल्यास निवडणुकीचे चित्र बदलू शकते, या आशेने दोन्ही पक्षांकडूनही इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणशैली आणि ठाकरे बंधूंची युती काहीतरी चमत्कार करेल, अशी इच्छुकांना आशा आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून निष्ठावानांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असल्याने कट्टर ठाकरे समर्थक उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नाशिक शहरात इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसकडे इच्छुकांचा ओढा तुलनेने कमी दिसत आहे. संघटनात्मक मरगळ, मागील निवडणुकांतील अपयश आणि सध्याच्या राजकीय स्थितीमुळे या पक्षांना सक्षम व जिंकणारेउमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान आहे. काही प्रभागांत तर इच्छुक मिळविण्यासाठीही कसरत करावी लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मात्र, इच्छुकांची संख्या जितकी जास्त तितकीच बंडखोरीची भीतीही वाढलेली आहे. तिकीट न मिळाल्यास नाराज उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बंडोबा उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता असून, याचा फटका सर्वच पक्षांना बसू शकतो. मागील निवडणुकांचा अनुभव पाहता बंडखोरीने अनेक प्रभागांमध्ये निकालांवर निर्णायक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी दुसर्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी पदरात पाडून घेत आव्हान निर्माण केले जाते. यामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर बंडोबांना थंडोबा करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाराजांची मनधरणी, पर्यायी जबाबदार्या, पदांची आश्वासने किंवा भविष्यातील संधी यांचा वापर करून बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अन्यथा हेच बंडखोर उमेदवार निवडणुकीचे गणित पूर्णपणे बिघडवतील आणि अनपेक्षित निकाल समोर येतील, अशी परिस्थिती यंदाच्या महापालिका निवडणुकीत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बंडखोरी अधिक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही पक्षांत विरोधी पक्षांतील अनेकांनी उमेदवारीच्या आशेने प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे पक्षात वर्षानुवर्षे असणार्या कार्यकर्त्यांनादेखील पक्षांकडून निष्ठेचे फळ म्हणून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इच्छुकांना उमेदवारी मिळविण्यापेक्षा पक्षांना उमेदवारी देताना मोठ्या परीक्षेचा सामना करावा लागणार आहे.
अन्यथा विजयाचे समीकरण बंडखोरांमुळे बदलले तर सत्तेच्या सोपानपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरच निवडणुकीचा निकाल ठरवतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही. इच्छुकांची गर्दी, संभाव्य युती-आघाड्या, अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे सावट यामुळे यंदाची मनपा निवडणूक अत्यंत चुरशीची व रोमांचक ठरणार, हे निश्चित. मतदारांनी कोणाला कौल द्यायचा, हे येणार्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल. मात्र, तोपर्यंत राजकीय रणधुमाळी आणखी तीव्र होत जाणार, यात शंका नाही.
Crowd of aspirants; Uniform for rebellion सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…