ग्राहकांना लुबाडण्याचा डाव : विरोधी पक्ष नेते दरेकर आरोप
नाशिक : वार्ताहर
राज्यातील वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि २२) भाजप कार्यालय येथे पत्रकार परिषदेत दिला . यासंबंधी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे हजारो कार्यकर्ते राज्यभर वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक देतील, व देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी घोषणा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शहर अध्यक्ष गिरीश पालवे ,आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल आहेर आदी उपस्थित होते