चार दुकानांचे शटर वाकवून रोख रक्कम लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद; रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची मागणी
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड येथील गजबजलेल्या बाजारपेठेत बुधवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी करत चार दुकानांमधून एक लाखाहून अधिक रुपयांची रोख रक्कम लंपास केली. आणखी एका दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न केला. या घटनेमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शास्त्री पथ रोडवरील गोरे अँड सन्स आणि जेनरिक मेडिसिन, शाहू महाराज पथवरील नम्रता स्वीट्स, जुने बिटको रुग्णालय परिसरातील पी. के. मेडिकल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सिल्वनिया केक शॉप या दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी चोरी केली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांत कैद झाली आहे. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी गोरे अँड सन्समधून सुमारे 60 हजार रुपये, जेनरिक मेडिसिनमधून 35 हजार रुपये, पी. के. मेडिकलमधून दहा हजार रुपये आणि सिल्वनिया केक शॉपमधून 6 हजार रुपये अशी एकूण एक लाख 11 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
नम्रता स्वीट्सचेही शटर वाकवण्यात आले. मात्र, तेथून रोख रक्कम हाती न लागल्याने चोरटे पसार झाले. प्राथमिक तपासानुसार ही चोरी पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडली. भर बाजारपेठेत अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी घडलेल्या ओंकार पॅटीस तोडफोड आणि विराज एक्सक्लुझिव्ह खंडणी प्रकरणांनंतर आता चोरीच्या घटनांनी व्यापार्यांची चिंता अधिक वाढली आहे. कोयते, तलवारी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे व्यापार्यांनी रात्रीची पोलिस गस्त वाढवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जेनरिक मेडिसिनचे ब्रह्मानंद प्रकाश वानखेडे आणि गोरे अँड सन्सचे राकेश गोरे यांनी या घटनेची माहिती दिली.
Daring theft in the bustling market of Nashik Road.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…