कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 31 ऑक्टोबर रोजी होणार्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती व अन्य शासकीय कार्यक्रमांच्या तयारीला वेग आला आहे. सर्व संबंधित विभागांनी सुरक्षा, वाहतूक, वाहनतळ, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे सूक्ष्म नियोजन करून ते 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ध्वजारोहण सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन होणार असल्याने सुरक्षाव्यवस्था, गर्दी नियंत्रण, बॅरिकेडिंग आणि सुरक्षा प्रवेशिकांचे नियोजन काटेकोरपणे करावे. वाहनांची ये-जा, वाहतूक मार्ग आणि वाहनतळ निश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम स्थळाची पाहणी करून व्यासपीठ, हेलिपॅड, विद्युत रोषणाई, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेला देण्यात आल्या. भाविकांच्या आरोग्यासाठी आवश्यक पथके नियुक्त करावीत, विश्रामगृहांमधील सुविधांकडेही लक्ष द्यावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम दुपारी 12.02 वाजता नियोजित आहे. रामतीर्थ, कुशावर्त तीर्थ, मंदिर परिसर आणि नवीन घाट परिसरातील ध्वजस्तंभ, सजावट, रोषणाई व अन्य सुविधांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. सायंकाळच्या कार्यक्रमासाठी नागरिकांचे आगमन लक्षात घेऊन प्रवेश, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस महानिरीक्षक ऐनपुरे यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत, पोलीस आयुक्त कर्णिक यांनी बंदोबस्ताबाबत, तर महापालिका आयुक्त खत्री यांनी रामतीर्थ परिसरातील स्वच्छता आणि गोदावरी आरतीच्या तयारीबाबत सूचना केल्या. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी वाहतूक मार्ग, नियंत्रण आणि वाहनतळ व्यवस्थापनाची माहिती दिली. सर्व विभागांनी सोपविलेली कामे वेळेत पूर्ण करून सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित पार पाडावा, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
17 ऑक्टोबर : त्र्यंबकेश्वर येथे ग्रामसभा
20 ऑक्टोबर : ‘हर घर कुंभध्वज’ उपक्रम
25 ऑक्टोबर : ‘शंखनाद’ गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस् कार्यक्रम
30 ऑक्टोबर : ग्राम परिक्रमा व संयुक्त पाहणी
31 ऑक्टोबर : सिंहस्थ कुंभमेळा महाध्वजारोहण सोहळा
Deadline of the 20th for flag hoisting