व्यक्ती तितक्या शक्ती

शुभदर्शना पाटील

आजवर खूप माणसं भेटली काही चांगली, काही कपटी, काही वाईट, काही कामापुरती चांगली, काही खरोखर जीवास जीव देणारी वगैरे वगैरे. विद्यार्थीदशेत तसे बरेच चांगले-वाईट अनुभवही आलेत. मग ते वैयक्तिक असो, शैक्षणिक असो वा कौटुंबिक असो. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आयुष्यात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक प्रसंगाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने खूप काही शिकवण्याचं काम केलंय.

आता बघा ना…
काही व्यक्ती अनपेक्षितपणे खूप प्रेम करून जातात, त्यांनी सतत प्रेमळ राहण्याचा धडा दिलाय. बर्‍याच व्यक्ती
निःस्वार्थपणे काही कोणतीही परतफेडीची अपेक्षा न करता निखळपणे जगण्याचा धडा देऊन गेल्या आहेत. कोणी अपमानास्पद वागणूक देऊन, कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि खंबीर राहण्याचा धडा देऊन गेलाय. कोणी चुकी नसताना सुनावून, शांतपणे ऐकून घेण्याची ताकद देऊन गेलंय. काहींनी पोट दुखेपर्यंत हसवून, सतत हसमुख राहण्याचा मंत्र दिलाय. कोणी खंबीरपणे पाठीशी उभे राहून, नेहमी मदतगार राहण्याचा धडा देऊन गेलेत. कोणी नेहमी टोचून बोलून, कोणत्याही परिस्थितीत मचिल्लम राहण्याचा धडा देऊन गेलंय. कोणी सतत आधार देऊन, दुसर्‍याचा आधारस्तंभ होण्याचा कानमंत्र देऊन गेलाय. कोणी विश्‍वासास पात्र समजून, विश्‍वासू बनण्याचा विश्‍वास ठेवून गेलंय. कोणी प्रशंसा करून, नेहमी जमिनीवर राहण्याचा धडा देऊन गेलंय. काही जणांनी नेहमी पाय खेचून, घट्ट पाय रोवून उभं राहण्याचा धडा देऊन गेलेत. कोणी विश्‍वासघाताचा चटका देऊन, जपून विश्‍वास ठेवण्याची शिकवण देऊन गेलाय. कोणी भुरळ घालून, मोहाला बळी पडू नकोस सांगून गेलंय. कोणी मैत्री अर्धवट सोडून, वचनबद्ध राहण्याचा निरोप ठेवून गेलाय. आणि या भूतलावर जन्माला आणून तो निःस्वार्थ आणि निर्मळपणे जगण्याचा सांगावा ठेवून गेलाय. अशा कित्येक माणसांचे, कित्येक धडे शिकवून झालेत, फक्त हे धडे गिरवण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवून गेलेत.

 

हे ही वाचा : अंगणवाडी सेविकांचे बँक खाते होल्ड

दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *