दोन्ही हात मनगटापासून वेगळे; पायांचा काही भाग प्राण्यांनी कुरतडला
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील औंढेवाडी शिवारात एका पडीक शेतात अज्ञात पुरुषाचा अत्यंत विघटित अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता मृत्यूला सुमारे 10 ते 15 दिवस उलटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढेवाडी येथील शिवराम कुंदे यांच्या पडीक शेतात सुमारे 55 ते 60 वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. दोन्ही हात मनगटापासून वेगळे झालेले आढळले, तर पायांचा काही भाग हिंस्र प्राण्यांनी कुरतडल्याचे प्राथमिक तपासात दिसले आहे. मृताच्या अंगावरील कपडेही
मृतदेहापासून काही अंतरावर पडलेले होते.
या घटनेची माहिती मिळताच औंढेवाडीचे पोलीसपाटील नाना चिधू कुंदे यांनी सिन्नर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात
घेतला.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींचीही पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, मृतदेहाची अवस्था अत्यंत विघटित असल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घातपाताचा प्रकार आहे, की अपघातामुळे मृत्यू झाला आहे, की मृत्यूनंतर हिंस्र प्राण्यांनी मृतदेहाची विटंबना केली आहे, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Decomposed body found in the Aundhewadi area.