हातात कोयता घेऊन बसस्थानकात दहशत

सिटीलिंक चालकाला शिवीगाळ, बसच्या काचेवर वार

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर बसस्थानक परिसरात भरदिवसा हातात कोयता घेऊन दहशत माजवणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आकाश देवीदास गोळेसर (26, रा. भोईगल्ली, सिन्नर) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी (दि.23) दुपारी आकाश देवीदास गोळेसर याने बसस्थानकातील स्वच्छतागृह परिसरात हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर सिटीलिंक बसच्या चालकाला शिवीगाळ करत धमकावले. तसेच बसच्या काचेवर कोयत्याने वार केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
या घटनेदरम्यान परिसरातील काही युवकांनी आरोपीच्या हालचालींचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत शोधमोहीम राबवून आरोपीला अटक केली.
पोलीस अंमलदार प्रशांत चंद्रभान सहाणेे यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र दारूबंदी
कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून
लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. पुढील तपास सुरू
आहे.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

’त्या’ तरुणाची परिसरात धिंड

सिन्नर बसस्थानक परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणार्‍या तरुणाची बुधवारी (दि.24) सायंकाळी पोलिसांनी बसस्थानक परिसरात धिंड काढली. धिंडीदरम्यान ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे,‘ असे आरोपीकडून पोलिसांनी वदवून घेतले. आदल्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन दहशत माजवणारा हा तरुण पोलिसांनी खाक्या दाखवताच कमालीचा नरमल्याचे पाहायला मिळाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची बसस्थानक परिसरात धिंड काढण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पा काकड, नवनाथ पवार, प्रशांत सहाणे आदी उपस्थित होते.

 

Panic at the bus station as a person brandishes a sickle.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *