पंचवटी : प्रतिनिधी
कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्राच्या दुमीर्र्ळ मुहूर्तावर मंगळवारी (दि. 24) शनि चौक येथील श्री कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग लागली होती. दर्शनासाठी येणारे भाविक परंपरेनुसार प्रसादासह मोरपीस अर्पण करीत असल्याचे चित्र मंदिर परिसरात पाहायला मिळाले.
श्री काशी नाट्टकोटाईनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि.23) अभिषेक, पूजाविधी आणि महाआरतीने महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर भाविकांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर संस्थेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती.कार्तिक पौर्णिमा सोमवारी रात्री 11 वाजून 52 मिनिटांनी सुरू होऊन मंगळवारी (दि.24) रात्री आठ वाजून 23 मिनिटांपर्यंत होती. कृतिका नक्षत्र सोमवारी रात्री 2 वाजून 2 मिनिटांनी सुरू होऊन मंगळवारी रात्री 11 वाजून 25 मिनिटांपर्यंत होते. या शुभमुहूर्तावर कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
कार्तिक स्वामींचे वाहन मोर असल्याने त्यांना मोरपीस अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार दर्शनासाठी आलेले भाविक श्रद्धेने मोरपीस अर्पण करीत होते. यानिमित्त मंदिराबाहेरील परिसरात मोरपीस विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. पुजारी आणि काही भाविकांच्या वतीने कार्तिक स्वामींच्या मूर्तीला विविध फळांच्या रसांचा अभिषेक करण्यात आला. पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Devotees queue since morning to have darshan of Kartik Swami