नाशिक : प्रतिनिधी
शहरात पारंपरिक उत्साहात रंगपंचमी साजरी होते. मात्र, इतर राज्ये व शहरांतून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी धुळवडीचा जल्लोेष केला. शासकीय सुट्टीमुळे बच्चेकंपनीपासून तरुणांपर्यंत सर्वांनी रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंद द्विगुणित केला.
शहरातील विविध भागांत लहान मुलांनी पिचकार्यांतून रंगांची बरसात केली. शाळा व महाविद्यालयांत नैसर्गिक रंगांच्या वापराबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसला. रासायनिक रंगांऐवजी फुलांपासून व औषधी घटकांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसला.
नाशिकची रंगपंचमी ही विशेष परंपरेसाठी ओळखली जाते. जुन्या नाशिक भागात पारंपरिक रहाड खोदून मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही कायम आहे. या पारंपरिक सोहळ्याची तयारी काही दिवसांपासून सुरू असून, स्थानिक मंडळांकडून नियोजन केले जात आहे.
दरम्यान, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रंग, पिचकार्या, फुगे व इतर साहित्यांची मोठी मागणी आहे. बच्चेकंपनीकडून आवडीने खरेदी सुरू असून, विक्रेत्यांनी विविध प्रकारचे नैसर्गिक रंग उपलब्ध करून दिले आहेत.
पारंपरिक रंगपंचमीसोबतच शहरातील विविध ठिकाणी रंगोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. डीजे, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जल्लोषमय वातावरण निर्माण होणार आहे. उत्साह, परंपरा व पर्यावरणपूरकतेचा संगम साधत नाशिककर रंगपंचमी साजरी करणार आहेत.
Dhulwad celebration; Preparations for Rangpanchami