नाशिकरोड बिटको रुग्णालयात डायलिसिस सेवा

12 कक्षांची व्यवस्था, रुग्णांची गैरसोय दूर होणार

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील डायलिसिस रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (बिटको) येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्र सुरू केले जाणार आहे. या डायलिसिस सेंटरसाठी दोन कोटींची तरतूद केली आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवली जात असून, सहा मक्तेदारांनी डायलिसिस सेंटरसाठी तयारी दर्शवली आहे.
प्रशिक्षित नर्स, वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने हे सेंटर चालवले जाणार आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच डायलिसिस सेवा रुग्णांना मिळणार आहे. या केंद्रामुळे रुग्णांची डायलिसिससाठी होणारी परवड थांबणार आहे. या निविदांवर लवकरच आयुक्त निर्णय घेणार आहेत.
नाशिक महापालिकेच्या वतीने स्वतःच्या व्यवस्थापनाखाली डायलिसिस सेवा सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात ही सुविधा होती. मनपाच्या नव्या केंद्रामुळे शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयात कमी दरात ही सेवा उपलब्ध होणार आहे. या केंद्राच्या सुरळीत कार्यान्वयनासाठी लागणार्‍या मनुष्यबळाची नियुक्ती आउटसोर्सिंग पद्धतीने करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

बिटको रुग्णालयात लवकरच डायलिसिस सेंटर सुरू होणार आहे. सामान्य नागरिकांना परवडणार्‍या दरात ही सेवा दिली जाईल.
-डॉ. विजय देवकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *