आडगाव बस डेपोचे काम अंतिम टप्प्यात
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र सरकारने देशभरातील शहरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी पीएम ई-बस योजनेंंतर्गत इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात नाशिक महापालिकेला 50 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. बस डेपोतील महावितरण कंपनीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हे काम होताच तीन महिन्यांत शहरात बसेस दाखल होणार आहेत. ऑक्टोबरअखेर बस डेपोचे काम होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विविध शहरांत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार नाशिकला 50 बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेची सिटीलिंक बससेवेच्या ताफ्यात दोनशे सीएनजी व पन्नास डिझेल बसेस आहेत. मात्र, यातील पन्नास डिझेल बसेस थांबवण्यात येणार असून, त्याऐवजी इलेक्ट्रिक बसेसला प्राधान्य दिले जाणार आहे. केंद्र शासनाने पीएमई बस योजनेंंतर्गत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. नाशिक महापालिकेला पहिल्या टप्प्यात वर्षभरात 50 बसेस देण्याचे आश्वासन दिले आहे.
महापालिकेचा यांत्रिकी विभाग गेल्या वर्षापासून शंभर इलेक्ट्रिक बसेससाठी आडगाव येथे बस डेपो उभारत आहे. यासाठी 27 कोटींचा खर्च असून, एनकॅप निधीतून निधी मिळणार आहे. आडगाव डेपोत चार्जिंग स्टेशन व महावितरणने दिलेले वीज उपकेंद्र असेल. त्यासाठी महापालिका एनकॅप योजनेंंतर्गत प्राप्त निधीतून सहा कोटी रुपये मिळणार आहेत.
प्रतिकिलोमीटर 71 रुपये खर्च
इलेक्ट्रिक बसेससाठी प्रतिकिलोमीटर 71 रुपये खर्च येणार आहे. त्यांपैकी 24 रुपये अनुदान केंद्र सरकार देईल. उर्वरित 47 रुपये खर्च मनपाला स्वत:च्या खिशातून द्यावा लागेल. इलेक्ट्रिक बससाठीचे वाहक सिटीलिंक चालकांनुसारच असतील. चालक कंपनीचे असणार आहेत.
बस डेपोतील महावितरणचे काम अंतिम टप्प्यात आले असून, काम संपताच बस कंपनीसोबत करार केला जाईल. त्यानंतर तीन महिन्यांत शहरात इलेक्ट्रिक बस दाखल होतील.
– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, मनपा