नाशिक ते अयोध्या-वाराणसी थेट रेल्वेसेवा

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकहून अयोध्या-वाराणसीसाठी थेट अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मागणीला यश आले आहे. परंपरा, श्रद्धा आणि आधुनिक विकास यांच्या संगमावर उभ्या असलेल्या नाशिक शहरासाठी अजून एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने दीर्घकाळ प्रलंबित असलेली थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी अखेर साकार झाली आहे. या यशामागे खासदार वाजे यांच्या सातत्यपूर्ण आणि दूरदर्शी पाठपुराव्याला यश आले आहे.
नाशिकसारख्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहराला देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांशी थेट जोडण्याची गरज अनेक वर्षांपासून प्रकर्षाने जाणवत होती. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम दि. 2 डिसेंबर रोजी खासदार वाजे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करत अयोध्या, तिरुपती, कटरा, वाराणसी व अजमेर या तीर्थक्षेत्रांसाठी थेट रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी केवळ पत्रापुरती मर्यादित न ठेवता, तिचा सातत्याने पाठपुरावा करत ती केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणण्यात खासदार वाजे यशस्वी ठरले. परिणामी भारतीय रेल्वेकडून नवीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा नाशिकच्या दृष्टीने विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
विशेषतः अयोध्या कॅन्ट ते मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) आणि बनारस- पुणे (हडपसर) या मार्गांवरील गाड्यांमुळे नाशिककरांसाठी धार्मिक प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुसंगत झाला आहे. यामुळे केवळ भाविकांनाच नाही, तर नाशिकच्या पर्यटन व अर्थकारणालाही नवी चालना मिळणार आहे. या सेवांचे लोकार्पण दि. 28 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरदेखील या गाडीचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. अमृत भारत एक्स्प्रेस ही केवळ एक रेल्वेसेवा नसून, ती आधुनिक भारताच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक मानली जात आहे. प्रवाशांची सुरक्षितता, स्वच्छता आणि आरामाच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा, स्वयंचलित दरवाजे, उन्नत आसनव्यवस्था आणि कवचसारखी सुरक्षा प्रणाली यांचा समावेश या गाडीत करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे नाशिक आता देशातील प्रमुख धार्मिक स्थळांशी अधिक घट्टपणे जोडले गेले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साकारलेला हा प्रकल्प केवळ एक सुविधा नसून, तो नाशिककरांच्या आकांक्षांचा आणि विश्वासाचा विजय मानला जात आहे.

नाशिक हे देशातील प्रमुख धार्मिक केंद्र आहे. नाशिक व परिसरातील भाविकदेखील मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनासाठी देशभर भ्रमंती करत असतात. या नवीन गाड्यांमुळे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. इतरही मार्गांवर गाड्या सुरू व्हाव्यात यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

वर्षभर सातत्याने पाठपुरावा
डिसेंबर 2024 मध्ये सर्वप्रथम खासदार राजभाऊ वाजे यांनी पत्राद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर सातत्याने त्यांनी याबाबत पाठपुरावा केला. त्याच फलस्वरूप म्हणून या एक्स्प्रेस गाडीला मंजुरी मिळाल्यानंतर तिला नाशिकलादेखील थांबा मिळाला. दीड वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यानंतर खासदार वाजे यांना हे यश प्राप्त झाले आहे.

संघर्ष सुरूच
आपल्या देशात धार्मिक पर्यटन हा फार सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक असा महत्त्वपूर्ण पैलू आहे. हेच लक्षात घेता अयोध्या, वाराणसीसह वैष्णोदेवी, काश्मीरसाठी कटरा, तसेच तिरुपती व अजमेर या मार्गांवरदेखील नाशिक येथून थेट रेल्वेसेवा असावी, अशी खासदार वाजे यांची मागणी आहे. त्यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरूच आहे.

Direct train service from Nashik to Ayodhya-Varanasi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *