भेदाभेद अमंगळ!

 – देवयानी सोनार

देवाच्या दर्शनाला भक्ती, पूजन, श्रद्धेला मोल नसते, असे म्हटले जाते. निःस्वार्थी, निष्काम भावनेने देवाचे पूजन-अर्चन केले जाते. देव भक्तीचा भुकेला असतो, असे म्हटले जाते; परंतु देवाच्या दर्शनाला आता पैसे मोजावे लागत असून, त्या बदल्यात भक्तांना ना सोयीसुविधा, ना कोणती सुरक्षा दिली जाते. मग या विकतच्या दर्शनाला देव पावणार का, असा सवाल भक्त करीत आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात देशविदेशातून कायम भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. दर्शनासाठी होणारा काळाबाजार यावर स्टिंग ऑपरेशन, बातम्यांमधून कायम समस्यांना वाचा फोडली असली, तरी भाविकांच्या सोयीची कोणतीच यंत्रणा उभारली नाही. देवदर्शन अधिक सोपे व्हावे यासाठी घेतलेला निर्णय आहे की भाविकांच्या श्रद्धेला आर्थिक भुर्दंड, याचे उत्तर भाविकांच्या अनुभवात आणि देवस्थानाच्या कारभारात दिसून येणार आहे.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद-भ्रम अमंगळ
सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे कुणाचाच भेदभाव करू नये, असे संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात. हे विश्वची माझे घर, असे ज्ञान जगाला देणार्‍या ज्ञानोबा माउलींचे गुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची भूमी असलेल्या त्र्यंबकमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या मंदिरात सध्या सामान्य भक्त आणि अडीच हजारांचा भक्त अशी भेदाची दरी निर्माण झाली आहे. त्र्यंबक मंदिरात पेडदर्शनाच्या नावाखाली विश्वस्त पुरुषोत्तम कडलग आणि त्यांच्या काही चेल्या चपाट्यांचे प्रताप समोर आल्यानंतर मंदिराची दर्शन व्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा होती. पण झाले उलटेच. कडलग जर दर्शनाचे तीन हजार रुपये घेतो. तर मंदिर प्रशासनाने अडीच हजार घेतले तर यातून मंदिराला भरघोस उत्पन्न मिळू शकेल, कदाचित हा विचार करून अडीच हजार रुपयांत पेडदर्शनाचा शोध लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, जगभरातील विविध मंदिरांतील पेडदर्शनाचे रेट सामान्य भाविकांच्या खिशाला परवडू शकतील, असे आहेत. त्र्यंबक मंदिराच्या व्यवस्थापनाने यावर कडी करत पेडदर्शनाचा जो अव्वाच्या सव्वा दर ठेवला आहे, तो सामान्य भक्ताला न परवडणाराच आहे. देवाच्या द्वारी भक्तीचा बाजार मांडला गेला असताना याबद्दल सारेच मूग गिळून गप्प आहेत. याबद्दल कुणीच चकार शब्दही उच्चारत नाही, याचेच खरे तर आश्चर्य वाटते.
अडीच हजारांत विकतचे दर्शन हे भाविकांच्या आर्थिक बजेटला ताण देणारे असले, तरी दुसर्‍या बाजूला हा निर्णय वेळेचे नियोजन म्हणूनही पहायला हवा. विमानात जसे इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास असतात, रेल्वेत विविध क्लास असतात, त्याचप्रमाणे मंदिरांमध्येही पर्यायी सेवा असू शकते, असेही काही नागरिकांकडून मत व्यक्त होते आहे. परंतु, मंदिर आणि बाजार यांच्यातील तुलना सर्वांनाच मान्य होईल असे नाही. कारण श्रद्धा ही सेवेसारखी खरेदी-विक्रीची बाब नाही; कारण देव बाजारचा भाजीपाला नाही. गुरुवार(दि.28)पासून जलद दर्शनासाठी देणगी दर्शनास सुरुवात करण्यात आली. यासाठी कुठलाही मध्यस्थ न ठेवता देवस्थानच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी 25 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असला, तरी सांपत्तिक स्थिती चांगली असणार्‍यांनाच देवाचे दर्शन मिळेल, गरीब, सर्वसामान्यांचा नाही. देव धनिकांचाच होऊन राहील, अशी आता भाविकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. देवदर्शनाला किंमत असावी का, सामान्य भाविक आणि सधन भक्त यांच्यात भेद निर्माण होत आहे की, वेळेची किंमत मोजणार्‍यांसाठी पारदर्शक व्यवस्था आहे. या सर्व प्रश्नांभोवती आज त्र्यंबकेश्वरचा मुद्दा फिरताना दिसतो आहे. देवस्थानाचा उद्देश पैसे कमावणे नसून, दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला काळाबाजार थांबवणे आहे. कारण यापूर्वी काही जण व्हीआयपी दर्शन, विशेष मार्ग, देणगी दर्शन अशा नावाखाली चार ते पाच हजार रुपये उकळत असल्याच्या तक्रारी होत्या. यासंदर्भात गुन्हेही दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक भक्तांच्या मते देवाच्या दर्शनाला किंमत लावली जाऊ शकत नाही. श्रद्धा ही आर्थिक क्षमतेवर अवलंबून नसावी, असे मत आहे. सामान्य भक्त तासन्तास रांगेत उभा राहणार आणि पैसे मोजणारा थेट गर्भगृहात जाणार हे चुकीचे आहे. बरं विकतचे का होईना पण अडीच हजार रुपये ही काही थोडीथिडकी रक्कम नाही. महिन्याला जो दहा-पंधरा हजारांत राब राब राबतो. त्याला ही रक्कम परवडणार आहे का? देशभरातील अनेक देवस्थानांचे उदाहरण पाहिले तर पेडदर्शनाचा रेट हा जेमतेम दोनशे ते पाचशे रुपये यादरम्यान आहे. मग त्र्यंबकेश्वरला एवढे अडीच हजार रुपयांचा दर कशासाठी? बरं या जमा होणार्‍या पैशाचा विनियोग कुठे होणार? कारण सर्व सुविधा, विकासकामे यासाठी शासनच पैसा खर्च करीत आहे. आताही सिंहस्थ निधीतूनच सारा विकास होत आहे. त्यामुळे उलट भाविकांना मोफत प्रसादासारखी योजना खरेतर मिळणार्‍या दानातून सुरू करायला हवी. त्याऐवजी भाविकांच्याच खिशावर डल्ला मारणारी ही पेडदर्शन योजना राबविण्याची खरंच गरज आहे का? याचा विचार होणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातून मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली कुटुंबे मनात दर्शनाची आस ठेवून त्यासाठी महिनोन्महिने वाट पाहून दर्शनासाठी वेळ काढून जात असतो. विकतचे दर्शन त्यांच्यासाठी अशक्य किंवा भक्तीची चेष्टा करणारी बाब ठरू शकते.
दुसरीकडे वास्तव नाकारून चालणार नाही. देशातील अनेक मंदिरांमध्ये धार्मिक स्थळांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष दर्शन व्यवस्था केलेल्या आहेत. लाखो भाविक मर्यादित जागा आणि वेळेचे बंधन या पार्श्वभूमीवर दर्शनाची पर्यायी व्यवस्था केलेली दिसून येते. काही भाविक कमी वेळेत दर्शन घेऊन पुढे जाण्याच्या उद्देशान आधीच खासगी दलाल, स्थानिकांच्या मदतीने किंवा गैरमार्गाने वापर करून दर्शन घेतात. अशा परिस्थितीत देवस्थानाने अधिकृत प्रणाली आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
दर्शनासाठी मिळालेल्या निधीचा जर खरंच भाविकांच्या सुविधा, स्वच्छता, सुरक्षा, पायाभूत कामे किंवा आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या तयारीसाठी वापरला गेला तर त्याचा चांगला संदेश भाविकांमध्ये जाऊ शकतो. देवस्थानाने केवळ शुल्क आकारून थांबण्यापेक्षा सर्वसामान्य भाविकांच्या सुविधेवर लक्ष देणे गरजेचे आहे. रांगेतील प्रतीक्षा कमी करणे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा, ऑनलाइन स्लॉट व्यवस्था, सावली, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यामध्ये सुधारणा केल्यास भाविकांची नाराजी दूर होण्यास मदत होऊ
शकते.
त्र्यंबकेश्वर देवस्थानाने ही व्यवस्था सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. त्यामुळे याचे परिणाम तक्रारी आणि लाभ याचे मूल्यमापन करणे गरजेचे ठरेल. जर काळाबाजार खरोखर थांबला, दलाल व्यवस्था संपुष्टात आली आणि निधीचा पारदर्शक वापर झाला तर ही प्रणाली यशस्वी ठरू शकते. परंतु, जर सामान्यांच्या गैरसोयी वाढल्या, आर्थिक भेदभावाची भावना निर्माण झाली किंवा पुन्हा नव्या प्रकारचा गैरव्यवहार सुरू झाला तर हा निर्णय जास्त वादग्रस्त होण्याची शक्यता आहे.

Discrimination is disgusting!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *