जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्यांच्या खात्यावर पाच हजार
नाशिक : प्रतिनिधी
अनियमित पावसामुळे खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने दिवाळी अग्रिमचे वितरण केले आहे. नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 4 लाख 47 हजार 43 शेतकर्यांच्या खात्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण 223 कोटी 52 लाख 15 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 12 नोव्हेंबरअखेरची ही आकडेवारी असून, दिवाळीच्या पाश्वर्र्भूमीवर शेतकर्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
नियमित दुष्काळी मदतीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पाच हजार रुपयांचे अग्रिम अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तालुकानिहाय वितरणात मालेगाव तालुका आघाडीवर आहे. तेथील 72 हजार 6 शेतकर्यांना मदत मिळाली आहे. त्याखालोखाल निफाडमधील 55 हजार 246, बागलाणमधील 52 हजार 491, येवल्यातील 51 हजार 639 आणि सिन्नरमधील 47 हजार 710 शेतकर्यांचा समावेश आहे.
दुष्काळ निवारणासाठी आर्थिक मदतीबरोबरच जमीन महसुलात सूट, पीककर्ज पुनर्गठन, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेतून कामे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, अन्नधान्य वितरण आणि पशुधनासाठी चार्याचे नियोजन अशा उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
तालुका लाभार्थी शेतकरी तालुका लाभार्थी शेतकरी
मालेगाव 72,006 निफाड 55,246
बागलाण 52,491 येवला 51,639
सिन्नर 47,710 चांदवड 38,129
नांदगाव 36,121 देवळा 22,642
कळवण 19,589 सुरगाणा 14,577
इगतपुरी 14,406 त्र्यंबकेश्वर 12,973
पेठ 9,514
निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेती व्यवसायासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. दुष्काळ कितीही मोठा असला, तरी शेतकर्यांनी खचून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आर्थिक मदत, कर्जविषयक सवलती, पाणीपुरवठा, चारा, रोजगार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकर्यांचे हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण हेच उपाययोजनांचे केंद्रबिंदू आहेत. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
Diwali advance provides a lifeline to farmers amidst drought