महाराष्ट्रासह देशभरातील लोकांच्या मागे पाऊस लागला आहे की काय, असा प्रश्न सहज उपस्थित होत आहे. यंदा श्रीगणेश बाप्पांचे लवकर आगमन झाले. बाप्पांचे आगमन होत असताना पाऊस थांबलेला नव्हता. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारतात पावसाचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांनी केलेली आरास, देखावे पाहण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे अशा ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी शहरांतही गर्दी उसळते. ग्रामीण भागातून लोक शहरांत देखावे पाहण्यासाठी येत असतात. यंदा या लोकांना पाऊस आडवा येण्याची शक्यता असून, लोकांच्या आनंदावर पाऊस विरजण घालणार, असाच हवामान विभागाचा अंदाज असून, उत्तर भारतातून माघारी फिरण्याचे पाऊस नाव घेईना. महाराष्ट्रात तो आणखी किती दिवस मुक्काम ठोकणार, हा प्रश्न आहेच. अनंत चतुर्दशीपर्यंत पाऊस राज्यात राहणारच, असा सर्वसाधारण अंदाज आहे. हरितालिकेच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवारी मुंबईसह कोकणात पुन्हा एकदा वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत सकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळत असल्यामुळे दृश्यमानता कमी होऊन वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे गणपतीसाठी रस्तेमार्गे मुंबईहून कोकणात गावी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मंगळवारपासून पावसाचा जोर आणखी वाढला. यंदाच्या गणेशोत्सवात पाऊस चांगलाच झोडपून काढणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण कोकण, उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मंगळवार आणि बुधवारी ‘यलो लर्ट’ जारी करण्यात आला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह संपूर्ण कोकणात मुसळधारेचा इशारा जारी करण्यात आला. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. दुपारनंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवाही पावसामुळे विस्कळित झाली. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यावर पावसाचे संकट येऊन कोसळले. 26 ऑगस्टपासून पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. तो खरा ठरला. दुसरीकडे, गणरायाचे आगमन होत असताना पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात बर्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्याते सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट विभागात मुसळधारेची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील आठवड्यात कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाऊस पडेल, तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वार्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर घाट विभागांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव यांसह विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह मराठवाड्यात मेघगर्जना, 30 ते 40 ताशी वेगाने वादळी वार्यासह पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांनाही हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या आठवड्यात चांगला पाऊस पडणार असून, काही जिल्ह्यांत शेतकर्यांना दिलासा देणारा, तर काही ठिकाणी नुकसानीचा ठरू शकतो. कोकण, गोव्यामध्ये 30 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यालाही पावसाचा फटका बसण्याचा अंदाज आहे. देशातील अनेक राज्ये सध्या मुसळधार पाऊस आणि पुराचा सामना करत आहेत. एकीकडे मुसळधार पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, तर उत्तर प्रदेशपासून उत्तराखंड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशापर्यंत अनेक भागांत पूर आणि पाणी साचल्याने परिस्थिती गंभीर आहे. अनेक राज्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पावसामुळे परिस्थिती बिकट आहे. हवामान विभागाच्या इशार्यानुसार राज्यातील 20 जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. पंजाबच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आज पठाणकोट, फाजिल्का, भटिंडा आणि होशियारपूरमधील शाळांना सुटी जाहीर करावी लागली. हिमाचल प्रदेशसाठीदेखील हवामान विभागाने 26 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला. चंबा, कांगडा, मंडी, कुल्लू, हमीरपूर, उना, बिलासपूर येथे मुसळधार पाऊस पडत आहे. शिमल्यामध्ये मुसळधारेमुळे 26 ऑगस्ट रोजी सर्व शालेय शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. मंडी, मनाली, उना आणि बिलासपूर येथे सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली. मुसळधारेमुळे मंडी आणि कुल्लू दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 3 (चंदीगड-मनाली महामार्ग) खराब झाला आहे. वाहतूक विस्कळित झाली. हिमाचल प्रदेशात दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि चार जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 26 ऑगस्ट रोजी चंबा आणि कांगडा येथे रेड अलर्ट, मंडी आणि कुल्लू येथे ऑरेंज अलर्ट आणि उना, बिलासपूर, लाहौल स्पीती आणि हमीरपूर या चार जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 30 जूनपासून हिमाचल प्रदेशात मुसळधारेमुळे 306 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 350 जण जखमी झाले आहेत. हवामान खात्याच्या मते, हिमाचल प्रदेशातील हवामान 31 ऑगस्टपर्यंत खराब राहणार आहे. हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा ढगफुटीची घटना घडली. किन्नौर जिल्ह्यातील पनवी नाल्यात ढगफुटीमुळे भयानक पूर आला आहे. ढगफुटीच्या घटनेनंतर आजूबाजूच्या गावांतील लोक घाबरले. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात खूप कमी किंवा अजिबात पाऊस पडत नाही; परंतु गेल्या काही महिन्यांपासून या भागात ढगफुटीच्या घटना आश्चर्यकारक आहेत. हिमाचल प्रदेश सध्या निसर्गाच्या दुहेरी आघाताचा सामना करत आहे. एकीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. दुसरीकडे, दररोज ढग फुटण्याच्या घटना समोर येत आहेत. 13 ऑगस्ट रोजी रामपूर बुशाहरच्या गणवी येथील श्रीखंड महादेवजवळ ढग फुटल्याने मोठ्या प्रमाणात पुरामुळे कहर झाला होता. गणवी खोर्यात आलेल्या लाटेमुळे गणवी पूल वाहून गेला. गणवी बसस्टँड पाण्याखाली गेला आणि जवळील दुकाने पाण्याखाली गेली आणि कचरा आत शिरला. स्थानिकांच्या मते, दोन शेड वाहून गेले, तर सहा शेड पाण्यात बुडाले. 13 ऑगस्ट रोजी आकाशातून आलेल्या आपत्तीमुळे राज्यातील पाच भागात, सिमला, किन्नौर, लाहौल-स्पिती आणि कुल्लू येथे प्रचंड विनाश झाला होता. त्यामुळे भयानक विनाश झाला. ऋषी डोगरी खोर्यात ढगफुटीमुळे होजो नाला येथे इतका पूर आला की, चार कामगार अडकले. पुराचे फोटो भयावह होते. मंडी येथील बियास नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक पंजवक्त्र महादेव मंदिराचा मोठा भागही पाण्यात बुडाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली प्रदेशात वादळ आणि मुसळधारेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने गुजरात, राजस्थान आणि हरियाणामध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. माता वैष्णो देवी मंदिर मार्गावर मंगळवारी भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 भाविक जखमी झाले. बुधवारी पुन्हा एकदा दरड कोसळून 41 जण ठार झाले. ढिगार्या खाली आणखी भाविक अडकलेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…