सिडको : प्रतिनिधी
‘पार्टी करण्यासाठी पैसे दे’ अशी मागणी करून पैसे देण्यास नकार दिल्याने चॉपरचा धाक दाखवत चालकाकडून एक हजार 250 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना पाथर्डी गाव परिसरात घडली. यावेळी तिघांनी चालकाला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशाल पांडुरंग बांडे (वय 39, व्यवसाय चालक, रा. मारुती मंदिर परिसर, पाथर्डी गाव) हे मनपा शाळेजवळील परिसरात होते. त्यावेळी स्वप्नील सोनकांबळे, सिद्धार्थ गरुड आणि यश धांडे यांनी त्यांच्याकडे ‘पार्टी करण्यासाठी पैसे दे’ अशी
मागणी केली.
बांडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर स्वप्नील सोनकांबळे याने कमरेला असलेला चॉपर काढून बांडे यांच्या मानेवर लावला आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर यश धांडे आणि सिद्धार्थ गरुड यांनी फिर्यादी बांडे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर स्वप्नील याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून 1 हजार 250 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान, बांडे यांच्या पत्नीला धक्का देऊन खाली पाडण्यात आले. तसेच शेजार्यालाही चॉपरचा धाक दाखवून धमकावण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी भीतीपोटी दुकाने आणि घरांचे दरवाजे बंद करून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Driver robbed at knifepoint after refusing to pay for a ‘party’