अमली पदार्थांचा दहशतवादासाठी व्यापार

पंतप्रधान : शत्रू देशांचा भारताविरुद्ध कट

नवी दिल्ली : प्रतिनिधी
अमली पदार्थांचा व्यापार (ड्रग्जचा सुळसुळाट) हा केवळ गुन्हेगारीपुरता मर्यादित नसून, तो शत्रू देशांच्या दहशतवादी अजेंड्याचा एक भाग आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीयस्तरावर ’नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’चा औपचारिक शुभारंभ केला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अमली पदार्थांच्या व्यापारावरून अत्यंत गंभीर इशारा दिला.

‘नशामुक्त संकल्प अभियान’चा प्रारंभ

देशाची युवाशक्ती कमजोर करून भारताची प्रगती रोखण्यासाठी आणि दहशतवादाला अर्थपुरवठा करण्यासाठी या बेकायदेशीर व्यापाराचा वापर केला जात असल्याने, अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात कोणतीही गय न करता अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार
पंतप्रधानांनी केला.
‘विकसित भारत’ घडवण्याच्या ध्येयामध्ये देशातील युवाशक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, या राष्ट्रव्यापी उपक्रमाद्वारे देशभरातील लाखो तरुणांना अमली पदार्थांच्या विरोधात संघटित करणे आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी संकल्पबद्ध करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत सामाजिक जाणीव-जागृतीसाठी विविध स्तरांवर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
या मोहिमेत देशभरातील शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि युवक संघटनांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतले जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संकुलांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे संदेश पोहोचवून तरुणांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. अमली पदार्थांचे सेवन रोखणे, व्यसनाधीन तरुणांचे पुनर्वसन करणे आणि ड्रग्जच्या पुरवठा साखळीवर पूर्णपणे टाच आणणे, अशा तीन टप्प्यांवर ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात
येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांची ऑनलाइन उपस्थिती

या राष्ट्रीय कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हीसी) विशेष उपस्थिती लावली. केंद्राच्या या राष्ट्रव्यापी मोहिमेला महाराष्ट्राचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, राज्यातील युवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी राज्य शासन सर्व यंत्रणांच्या माध्यमातून कठोर पावले उचलेल आणि हे अभियान तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Drug trafficking for terrorism

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *