आरोपापूर्वी आत्मपरीक्षण करावे : उदय सांगळे
सिन्नर : प्रतिनिधी
मिरगाव येथील भोंदूबाबा प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे युवानेते उदय सांगळे यांनी प्रतिक्रिया देत आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.
विद्यमान आमदारांच्या पहिल्या निवडणुकीपासून कोकाटे परिवाराकडून विविध पूजापाठ व मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती संपूर्ण सिन्नर तालुक्याला असल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात यापूर्वी अनेक वृत्तपत्रांतही बातम्या प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्येश्वर संस्थानचा विकास झाला त्या काळात कोकाटे हेच आमदार होते. आजही सिन्नर शहराला आठ-आठ दिवस पाणी मिळत नसताना दारणा नदीतून 39 लाख लिटर पाणी उचलण्याची परवानगी कोकाटे आमदार असतानाच देण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात कोकाटे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सांगळे यांनी केली.
आपला खरात यांच्याशी कोणताही थेट संबंध नसून सार्वजनिक कार्यक्रमात कधीकधी एकत्र येणे हा योगायोग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कोकाटे आमदार असताना सिन्नर तालुक्यात भोंदूगिरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू होते, याची जबाबदारी त्यांनाही घ्यावी लागेल, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या सहा महिन्यांत कोकाटे यांच्या विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे तसेच रमी जुगार प्रकरणामुळे गमावलेले मंत्रिपद, गरिबांच्या घरांच्या प्रकरणात न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि शेतकर्यांविषयीची वक्तव्ये यामुळे सिन्नर तालुक्याची प्रतिमा राज्यभर खराब झाल्याचा आरोपही सांगळे यांनी केला.
खरात संस्थानच्या विश्वस्तांची यादी पाहिल्यास कोकाटे यांचे समर्थक आजही त्या संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोप करण्यापूर्वी त्यांच्या बगलबच्चांनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोकाटे यांनी रमी जुगार प्रकरणामुळे सिन्नर तालुक्याला मिळालेले मंत्रिपद गमावले. तसेच गेल्या तीस वर्षांत आमदार असतानाही क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष योगदान देता आले नसल्याची टीकाही सांगळे यांनी केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले क्रीडासंकुल पूर्ण करता आले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
टीका करणे दुर्दैवी
सिन्नरमध्ये आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले असून त्यावर टीका करणे दुर्दैवी असल्याचे सांगत सिन्नरमध्ये मोठ्या क्रीडा स्पर्धा होत असताना त्यावर टीका करणे ही केवळ पोटदुखीची असल्याचा आरोपही सांगळे यांनी केला.