जुने नाशिक : वार्ताहर
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाच द्वारका चौकात अंडरपासच्या सुरू असलेले कामामुळे येथील रस्ते गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वाहतुकीस बंद करण्यात आले होते; परंतु येथील अंडरपासचे काहीसे काम पूर्ण झाल्याने सुमारे बावीस मीटरवर स्लॅब टाकून त्यावरील रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकडून धुळे व धुळ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे.
या चौकातून पुन्हा एकदा वाहतूक सुरू झाल्याने स्थानिक वाहनचालकांबरोबरच प्रवासी वाहतूकदारांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, हा रस्ता सुरू झाल्याने शहरातील इतर भागांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.पण या रस्त्यावरील वडाळा नाका व ट्रॅक्टर हाउस चौकात काही वेळा वाहतूक कोंडी होण्याची भीती वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. या भागातून मुंबईकडून धुळ्याकडील रस्ता सुरू झाला असला तरी नाशिक ते पुणे हा रस्ता येथील काम पूर्ण झाल्याशिवाय सुरू करता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
Dwarka Chowk partially open for traffic.