होळकर पूल, वाहतूक सुविधा कामांना गती द्या

सिंहस्थपूर्व कामांचा आ. फरांदेंनी घेतला आढावा

नाशिक : प्रतिनिधी
सन 2027 मध्ये नाशिकमध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा, गोदावरी नदीसंवर्धन, पूरनियंत्रण आणि धार्मिक वारसा जतनाशी संबंधित 12 महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिका प्रशासनासोबत चर्चा केली. या कामांतील अडचणी जाणून घेत आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
देश-विदेशातून कोट्यवधी भाविक सिंहस्थासाठी नाशिकमध्ये येणार असल्याने भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, नदीसंवर्धन आणि धार्मिक स्थळांपर्यंत सुलभ सुविधा उपलब्ध होण्यासाठी ही कामे सिंहस्थपूर्वी पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे. दरम्यान, या कामांसंदर्भात पंचवटीतील स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेविका संध्या कुलकर्णी, सुनील खोडे, माजी महापौर विनायक पांडे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, प्रशांत पगार, बांधकाम विभागाचे उपअभियंता शेलार, श्री. शेळके आदी उपस्थित होते. यावेळी कामांना गती देण्याच्या दृष्टीने आयुक्त खत्री यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली.
गोदावरी पात्र स्वच्छ व निर्मळ राहावे याकरिता होळकर पुलाजवळ फिल्टरेशन प्लांट उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. नमामि गोदा प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार हे काम हाती घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. पूरनियंत्रणाच्या दृष्टीने जुना होळकर पूल परिसरातील बंधारा हटवणे, तसेच होळकर पूल ते टाळकोटेश्वर मंदिर परिसरातील नदीपात्राचे काँक्रीटीकरण काढून गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह पुनर्स्थापित करण्याचे त्यांनी सूचित केले. एकमुखी दत्तमंदिर ते रविवार कारंजा जोडणार्‍या जीर्ण रस्ते व पायर्‍यांचे नूतनीकरण, दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. बालाजी कोट परिसरातील धोकादायक दुमजली इमारत हटवून त्या ठिकाणी रामझुला पुलासाठी आधुनिक पादचारी रॅम्प उभारावा. याशिवाय बालाजी कोटचे स्ट्रक्चरल ऑडिट करून गाडगे महाराज पुलाच्या बाजूनेही स्वतंत्र पादचारी रॅम्प उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. होळकर पूल, रामसेतु, पूरनियंत्रण उपाययोजना, रामतीर्थ परिसरातील पाणी शुद्धीकरण, तसेच पर्यायी रस्ते विकास यांसारखी कामे वेळेत पूर्ण झाल्यास भाविकांना मोठा दिलासा मिळेल. सिंहस्थपूर्वी ही कामे पूर्ण झाल्यास त्याचा लाभ केवळ कुंभमेळ्यापुरता मर्यादित राहणार नसून नाशिककरांनाही दीर्घकालीन स्वरूपात होणार आहे.
– प्रा. देवयानी फरांदे, आमदार

गंगापूर रोडवरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन फॉरेस्ट नर्सरी ते वृंदावन लॉन्सदरम्यान 24 मीटर रुंदीचा पर्यायी समांतर रस्ता विकसित करण्यासाठी सिंहस्थ प्राधिकरणामार्फत सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Accelerate work on the Holkar Bridge and traffic infrastructure.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *