कमी प्रथिने खा, दीर्घायुषी व्हा!

आपल्या अन्नाचे महत्त्वाचे घटक म्हणजे कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे आणि खनिजे ही होत. कर्बोदके आपल्याला ऊर्जा देतात तर आपल्याला मेदमुळे स्थिर ऊर्जा मिळते. जीवनसत्त्वे रोगप्रतिकारशक्तीला आधार देतात. अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला आधार देण्यास मदत करतात. तर खनिजे शरीराच्या कार्याचे नियमन करतात. हाडे मजबूत करतात.
प्रथिने तथा प्रोटीन्स हे शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंच्या दुरुस्तीसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि विविध जैवरासायनिक क्रियांसाठी अत्यावश्यक पोषकतत्त्व आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ‘हाय-प्रोटीन’ आहाराचा मोठ्या प्रमाणावर प्रचार होत आहे. आरोग्यदायी जीवनासाठी या अन्नघटकांचे शरीरात संतुलन असणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे संतुलन बिघडले तर आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
मात्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका व्यापक वैज्ञानिक आढाव्याने या संकल्पनेला वेगळा दृष्टिकोन दिला आहे. या संशोधनानुसार, विशेषतः कमी शारीरिक हालचाल करणार्‍या प्रौढांमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी प्रथिने घेणे चयापचय सुधारण्यास, वृद्धत्वाची गती मंदावण्यास आणि दीर्घायुष्याला चालना देण्यास उपयुक्त
ठरू शकते.
या आढाव्यात 350 हून अधिक संशोधनांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या मते, केवळ कॅलरी कमी करण्याऐवजी प्रथिनांचे प्रमाण नियंत्रित केल्याने शरीरात अनेक अनुकूल जैविक बदल घडतात. यामध्ये पेशींवरील ताण कमी होणे, पेशींची दुरुस्ती वाढणे, चयापचय अधिक कार्यक्षम होणे आणि दाह कमी होणे यांचा समावेश आहे.
या परिणामांमध्ये एफजीएफ – 21 या संप्रेरकाची तथा हार्मोनची महत्त्वाची भूमिका असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यावर या संप्रेरकाचे शरीरात प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वापर सुधारतो, रक्तातील साखरेचे नियंत्रण अधिक चांगले होते, इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि दाह कमी होण्यास मदत होते.
संशोधकांनी विशेषतः मेथिओनिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन या अमिनो आम्लांकडे लक्ष वेधले आहे. ही अमिनो आम्ले प्रामुख्याने मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि काही उच्च-प्रथिनयुक्त अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यांचे अतिसेवन झाल्यास वृद्धत्वाशी संबंधित जैविक प्रक्रिया, दीर्घकालीन दाह आणि लठ्ठपणाला चालना मिळू शकते, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
तथापि, याचा अर्थ प्रथिने टाळावीत असा अजिबात नाही. खेळाडू, नियमित व्यायाम करणारे, गर्भवती महिला, वाढत्या वयातील मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांना स्नायूंचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या वय, आरोग्यस्थिती आणि शारीरिक हालचाल यानुसार प्रथिनांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे.
यापूर्वीच्या अनेक संशोधनांमध्येही कमी प्रथिने किंवा विशिष्ट अमिनो आम्लांचे मर्यादित सेवन केल्यास प्राणिमॉडेलमध्ये आयुष्य वाढणे आणि चयापचय सुधारण्याचे संकेत मिळाले आहेत. तथापि, मानवांमध्ये आयुष्य निश्चितपणे वाढते, असा ठोस निष्कर्ष अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे अधिक दीर्घकालीन मानवी संशोधनाची गरज असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर संशोधकांनी वनस्पतीजन्य प्रथिनांना (डाळी, कडधान्ये, सोयाबीन, सुका मेवा) प्राधान्य देण्याचा सल्लाही दिला आहे. काही मोठ्या लोकसंख्येवरील अभ्यासांमध्ये मध्यम वयात वनस्पतीजन्य प्रथिनांचे अधिक सेवन केल्यास निरोगी वृद्धत्वाची शक्यता वाढते, असेही आढळले
आहे.
थोडक्यात जास्त प्रथिने म्हणजे अधिक ‘आरोग्य’ हा समज प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. संतुलित, वैयक्तिक गरजांनुसार आखलेला आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रथिनांचे योग्य प्रमाण ठेवणे हीच निरोगी व दीर्घायुषी जीवनाची गुरुकिल्ली आहे. नव्या संशोधनाने प्रथिनांविषयीचा दृष्टिकोन अधिक संतुलित करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Eat less protein, live longer!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *