राज्यांतर्गत पीक स्पर्धा 2026 : आधुनिक शेतीचा नवा मानदंड

– सोनाली कदम

शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नसून, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभव यांचा समन्वय आहे. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाची गरज लक्षात घेता महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग दरवर्षी राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करतो. खरीप हंगाम 2026 साठी या स्पर्धेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यातील शेतकर्‍यांसाठी ही आपल्या शेतीतील कौशल्य सिद्ध करण्याची आणि राज्यस्तरावर नाव कमावण्याची सुवर्णसंधी आहे.
या स्पर्धेचा उद्देश केवळ जास्त उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा गौरव करणे एवढाच नाही, तर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, संतुलित खत व्यवस्थापन, जलसंधारण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सुधारित बियाण्यांचा वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे हाही आहे. उत्कृष्ट उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांच्या अनुभवातून इतर शेतकर्‍यांनाही प्रेरणा मिळते आणि राज्यात निरोगी स्पर्धेचे वातावरण निर्माण होते. यंदाच्या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर होणार असून प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 50,000, द्वितीय 40,000 आणि तृतीय 30,000 इतकी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
अर्ज कुठे आणि कसा करावा?
पीक स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. शेतकर्‍यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in/G$ý  या संकेतस्थळावर जाऊन पीक स्पर्धा नोंदणी या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरावा. अर्ज भरताना आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून कागदपत्रे अपलोड करावीत. ऑनलाइन अर्ज भरताना अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा महा-ई-सेवा केंद्राची मदत घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत – फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याची पावती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र.
अर्ज करण्याची अंतिम मुदत
मूग व उडीद – 10 ऑगस्ट 2026, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल – 31 ऑगस्ट 2026.
पीक स्पर्धेमुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतीचे वैज्ञानिक मूल्यमापन करण्याची संधी मिळते. कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून पिकांची पाहणी केली जाते, योग्य तंत्रज्ञानाचा वापर तपासला जातो आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शेतकर्‍यांना सन्मानित केले जाते. यामुळे आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार होऊन इतर शेतकरीही नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास प्रेरित होतात. आज ड्रोनद्वारे फवारणी, मृदा परीक्षण, हवामान आधारित सल्ला, सूक्ष्म सिंचन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे शेतकरी अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळवत आहेत. पीक स्पर्धा अशा नवोन्मेषी शेतकर्‍यांना राज्यासमोर आणण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकर्‍याने या स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःच्या शेतीची गुणवत्ता सिद्ध करावी. ही स्पर्धा केवळ बक्षिसासाठी नसून उत्कृष्ट शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि समृद्ध शेतकरी या संकल्पनेला बळ देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

अधिक माहितीसाठी :

संकेतस्थळ : https://krishi.maharashtra.gov.in/G$ý टोल-फ्री हेल्पलाइन : 1800 233 4000 किंवा आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

Intra-State Crop Competition 2026: A New Benchmark for Modern Agriculture

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *