नव्या पिढीला आत्महत्येच्या विचारांपासून रोखू या..

चला मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न करू या;

       सोशल मीडियाचा योग्य वापर करण्यासाठी जनजागरण

नाशिक : मुुकुंद बाविस्कर
अलीकडच्या काही वर्षांमध्ये आत्महत्या हा विषय पूर्वी किशोरवयीन मुला-मुलींमध्ये अत्यंत क्वचित बघितला जायचा. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या वाढलेल्या दिसून येतात, ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ज्यामध्ये मोबाइल, इंटरनेट, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, यूट्यूब, सोशल मीडिया यांचा वापर शाळकरी मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीसाठी नाशिक शहरासह राज्यभरात प्रयत्न सुरू आहेत. दि. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो .
अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. यामागे नेमके काय मानसिक ताणतणाव त्यांना असतात, याबद्दल मानसशास्त्रज्ञ आणि मानसिक विकारतज्ज्ञदेखील चिंता व्यक्त करत
आहेत.
मनुष्याच्या शरीरात किती सुदृढ असले तरी मन स्वास्थ्य किंवा मनःस्थिती ठीक नसेल तर सर्व काही व्यर्थ ठरते, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे युवा पिढी तर वाढत्या ताणतणावांमुळे मानसिक स्थिती बिघडल्याने रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या शारीरिक आजारांची लक्षणे प्रमाण वाढल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करतात.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले की, संवादाचा अभाव, तंत्रज्ञानाचा अति वापर, आभासी मोबाइलच्या जगात जास्त वावरणे,
स्पर्धेच्या युगाची अति कठोरता अशी विविध कारणे यामध्ये सांगता येतील. याच मुद्यावर सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद हवा. मोबाइलचा वापर कमी हवा. शाळा-कॉलेजमध्ये मानसिक आरोग्यावर चर्चासत्र आयोजित करण्यात यावे. मुलांना व्यसनांपासून कसे दूर ठेवता येईल हे पाहायला हवे. प्रेमप्रकरणे, व्यसने यावर मुक्त संवाद मुलांबरोबर व्हायला हवा. तसेच मानसिक ताणतणाव वाढला, मानसिक आजारांची लक्षणे कशी ओळखावी हे सर्वांना माहिती असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
मनुष्याचे सर्व वयोगटात योग्य शारीरिक तसेच मानसिक स्थिती योग्य असणे म्हणजे मानसिक आरोग्य होय, अशी आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. विशेषत: तरुण पिढीमध्ये धावपळीचे आयुष्य, वाढती स्पर्धा, कामाच्या ठिकाणी ताणतणाव यामुळे मानसिक आजार वाढल्याचे सांगण्यात येते. स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक विकारांमुळे ग्रस्त असलेले लोकांचे आयुष्य सामान्य लोकांपेक्षा 10 ते 20 वर्षे कमी होत आहे. त्याचप्रमाणे जगभरात काही मोजक्या देशांतील लोकांना दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा मिळत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मानसिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या एकूण व्यक्तींपैकी सुमारे 85 टक्के लोक उपचारांपासून वंचित राहतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार विकसनशील देशामध्ये आरोग्यावरील एकूण खर्चापैकी केवळ 1 टक्के मानसिक आरोग्यावर खर्च केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल साक्षरता बाळगणे आवश्यक आहे. यासाठी जागतिक स्तरावर, वैयक्तिक स्तरावर, सरकारी नियोजनात, सामाजिक वातावरणात सगळीकडे मानसिक आरोग्याचा जागर करणे गरजेचे आहे,असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर समाजाच्या मानसिक आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वतःच्या आणि सर्वांच्या मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. मानसिक आरोग्य सर्वांचा हक्क आणि अधिक गुंतवणूक : अधिक उपलब्धता असे आहे. याकरिता सर्वप्रथम ज्यांना मानसिक आजार आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनापासून समजून घेणे आवश्यक आहे. या व्यक्तींना समाजात, नातेवाइकांत, शेजारी, कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे सामावून घ्यावे, तसेच त्यांना कमी लेखू नये, सर्वांनी एकमेकांमधील संवाद, भावनिक संपर्क नियमित करणे, वाढवणे गरजेचं आहे, असेही तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले.

आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातच एकमेकांशी तुलना आणि स्पर्धादेखील वाढली आहे. ही स्पर्धा सकारात्मक हवी, नकारात्मक नको. कारण स्पर्धेचे युग जास्त कठोर होत चालले आहे. मित्र-मैत्रिणींमधले भांडण-तंटे यांच्यामुळेदेखील मोठ्या प्रमाणात मानसिक ताणतणाव दिसतो आहे. मानसिक आजार तसेच व्यसनांचे प्रमाणदेखील नकळत्या वयात जास्त दिसत आहे. अशा विविध कारणांमुळे एक दुर्दैवी दुष्परिणाम म्हणून आत्महत्यांचे प्रमाण या वयोगटात वाढलेले दिसत आहे.विशेषतः 15 ते 25 वयोगटातील मुलांमध्ये भारतात आत्महत्या वाढल्या असून, याबाबत आपला देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अत्यंत भयानक आणि धोकादायक बाब म्हणता येईल.
– डॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ज्ञ , नाशिक
कुटुंबात संवादाचा अभाव, तंत्रज्ञानाचा अति वापर, आभासी मोबाइलच्या जगात जास्त वावरणे, स्पर्धेच्या युगाची अतिकठोरता अशी विविध कारणे यामध्ये सांगता येतील. याच मुद्यावर सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद हवा. मोबाइलचा वापर कमी हवा. शाळा-कॉलेजमध्ये मानसिक आरोग्यावर चर्चासत्र आयोजित करण्यात यावे. मुलांना व्यसनांपासून कसे दूर ठेवता येईल हे पाहायला हवे. तसेच मानसिक ताणतणाव वाढला आहे. याप्रकारची काही लक्षणे आढळून आल्यास वेळेत मनसोपचारतज्ज्ञाची मदत घेणे कसे हितावह आहे, हा संदेशदेखील वाढत्या वयात शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींनी नेहमीच जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याद्वारे आपण तरुण पिढीचे मानसिक आरोग्य संवर्धन करून आत्महत्येसारखे दुर्दैवी धोके दूर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करू शकतो.
– डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ, नाशिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *