नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आर्कि. आश्विनी आहेर यांनी कोविड काळात केलेल्या कामाचे कौतुक करून आर्कि. आश्विनी आहेर या राज्यात कार्यक्षम सभापती म्हणून उदयास आल्या असल्याचे गोरवोद्गार उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी कार्यक्रमाप्रसंगी काढले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची मासिक सभा सभापती आर्कि. अश्विनी अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र शनिमहाराज नस्तनपूर (ता. नांदगाव) येथे झाली. यावेळी दीपक चाटे बोलत होते.
सभेस जि. प. सदस्य कविता धाकराव, रेखा पवार, सुनीता सानप, गीतांजली पवार गोळे, कमल आहेर, गणेश अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) दीपक चाटे व 26 प्रकल्पांतील बालविकास अधिकारी सहभागी झाले होते.
यानंतर नस्तनपूर येथे अंगणवाडी सेविका मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास 200 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी सभापती आश्विनी आहेर यांनी अंगणवाडी सेविकांचे कौतुक करताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांत कोविड काळात जीवाची पर्वा न करता तळागाळापर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कामकाज करून पोषण आहार घरपोच देऊन सेवा दिली. 60 लक्ष अंडी वाटप केले. कोविड काळात 600 अंगणवाडी सेविकांनी सेवा दिली ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी नस्तनपूर येथे इमिटेशन ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी तयार केलेल्या अतिशय सुंदर दागिन्यांचे प्रदर्शन सादर करून प्रशिक्षणाचा लाभ झाल्याचे सांगितले.