सिडको : विशेष प्रतिनिधी
सिव्हिल हॉस्पिटल परिसरात दोन अनोळखी महिलांनी विश्वास संपादन करून 64 वर्षीय महिलेची सुमारे दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लताबाई आबाजी लभडे (रा. पाटील पार्क, चुंचाळे शिवार, सातपूर-अंबड लिंकरोड) या 20 मे रोजी दुपारी सुमारे 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटल येथे पायाच्या दुखण्यावर उपचार घेऊन बाहेर पडत होत्या. त्यावेळी गेटजवळ त्यांना दोन अनोळखी महिला भेटल्या. त्यापैकी एक महिला अंदाजे 45 ते 50 वर्षांची, तर दुसरी महिला अंदाजे 60 ते 65 वर्षांची होती.
या महिलांनी “आम्ही बाहेरगावच्या आहोत, आम्हाला सोनाराचे दुकान दाखवा,” असा बहाणा करून लताबाई यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांना रिक्षात बसवून पुन्हा सिव्हिल हॉस्पिटल परिसरात आणले. तेथे पिण्याच्या पाण्यातून काहीतरी पदार्थ देऊन त्यांना गुंगी आणली व त्यांच्या अंगावरील सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत तसेच 50 हजार रुपये किमतीचे कानातील दागिने असा एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज काढून घेत फसवणूक केली. घटनेनंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Elderly woman’s jewellery worth 1.5 lakh stolen; case registered