जि.प.प्राथमिक शाळेत शिकूनही उच्चपदस्थ अधिकारी होत चौधरी भावंडांनी घातली आकाशाला गवसणी
मराठी शाळांच्या गुणवत्तेला तोड नाहीच
लासलगाव:-समीर पठाण
सध्या इंग्रजी शाळांचे स्तोम माजले आहे.एकीकडे भरमसाठ फी ने पालकांचे कंबरडे मोडलेले असतांना देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून मराठी माध्यमातील शाळांकडे वळण्याचा कल ग्रामीण भागात निराशाजनक दिसतोय. शिक्षण विभागाची मराठी शाळांवर असलेली बारीक नजर, मेहनती आणि तज्ञ शिक्षक, विद्यार्थी पुरक वातावरण यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील मुले देखील कुठे कमी पडत नाहीयेत. याच जिल्हा परिषद शाळेत शिकून उच्चपदावर गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची संख्या काही कमी नाही. देवगाव ता.निफाड येथील तीन भावंडांनी देखील मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन सरकारी उच्चपदस्थ अधिकारी पदाला गवसणी घातली असल्याने मराठी शाळांतील पाल्यांच्या प्रवेशाचा मुद्दा पालकांपुढे विचारार्थ आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतात. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी या शाळा आवश्यक आहेत. या शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अशा शाळा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करतात.
मूळचे एरंडोल जि.जळगाव येथील रहिवासी असलेले व देवगाव ता.निफाड येथे रघुनाथ श्रावण चौधरी हे कालवे निरीक्षक म्हणून नोकरीस होते. त्यांनी देवगाव व कोपरगाव तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी नोकरी निमित्त वास्तव्य केले. फिरती नोकरी असल्याने त्यांच्या विनोद, श्याम आणि माधवी या मुलांची देखील शाळा बदल होत होती. तरी देखील त्यांनी मुलांना मराठी माध्यमातील शाळांमध्येच दाखल केले. तिन्ही मुलांचे शिक्षण सरकारी शाळेतून झाले. पुढे मुलीने पोलीस भरती व्हावे अशी वडिलांची इच्छा असल्याने तिने थेट पोलीस निरीक्षक पदालाच गवसणी घातली.
अगोदर नाशिक येथील विशेष शाखेत व आता महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी नाशिक येथे पोलीस निरीक्षक असलेली आपली मुलगी माधवी हिच्या उंच शरीरयष्टीमुळे पोलीस व्हावे ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. मात्र वडिलांच्या इच्छेखातर मुलगी माधवी चौधरी थेट पोलीस उपनिरीक्षक झाली. माधवीचे प्राथमिक शिक्षण देवगावच्या जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय कोळपेवाडी, पदवी शिक्षण लासलगाव येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात झाले. तिने इंग्लिश विथ अमेरिकन लिटरेचर यात एम.ए केले. त्यानंतर तिचा अधिकारी पदाचा प्रवास सुरु होऊन सन १९९९ ला पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.
सध्या जळगाव येथे परिवहन अधिकारी (आर.टी.ओ) असलेल्या विनोद चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा देवगाव, इयत्ता माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय कोळपेवाडी, उच्च माध्यमिक शिक्षण महावीर कॉलेज लासलगाव व त्यानंतर उस्मानाबाद येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी घेतली. अहमदनगर येथे परिवहन अधिकारी (आर.टी.ओ) असलेल्या शाम चौधरी यांचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वेळापूर, माध्यमिक शिक्षण देवगाव विद्यालय व त्यानंतर मेकॅनिकल इंजिनीरिंग जळगांव येथे केले. इंजिनियरिंग मध्ये शिक्षण घेतले असल्याने दोघाही बंधूनी प्रादेशिक परिवहन अधिकारी होण्याचा ध्यास घेतला, प्रचंड मेहनत घेऊन दोघेही भाऊ सन २००७ साली एकाच वेळेस परिवहन अधिकारी (आर.टी.ओ) पदाची परीक्षा पास झाले. या निमित्ताने इंग्रजी माध्यमातील शाळांचे आकर्षण असलेल्या पालक वर्गासाठी मराठी शाळांतील पाल्यांच्या प्रवेशाचा मुद्दा पालकांपुढे विचारार्थ आला आहे.
जि.प.प्राथमिक शाळा हे शिक्षणाचे भविष्य आहे. अशा शाळा निर्माण करण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला पाहिजे.
शाम चौधरी
परिवहन अधिकारी (आर.टी.ओ)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा आहेत. शिक्षण हे जीवनाचा पाया आहे आणि हे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात प्राथमिक शाळा उभारल्या आहेत. या शाळा मुलांमध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात आणि त्यांना चांगले नागरिक बनण्यासाठी घडवतात. याच शाळेत शिकून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण असाध्य गोष्टही साध्य करू शकतो. आज इंग्रजी माध्यम शाळांचे प्रस्थ व आकर्षण वाढले असले तरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील कमी नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही भावंडे.
विनोद चौधरी
परिवहन अधिकारी (आर.टी.ओ)