खोदकाम उठले नागरिकांच्या जिवावर

बॅरिकेडिंगचा अभाव; खड्डयांत वाहने कोसळण्याचा धोका

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे सध्या विविध प्रकारच्या रस्ते, तसेच विकासकामांना वेग आला आहे. त्याचे रात्रंदिवस काम केले जात आहे. मात्र, युटिलिटीची कामे करताना महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करूनही ठेकेदारांकडून कोणत्याच प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. सातपूरच्या अशोकनगर भागात रविवारी (दि. 7) रस्त्यावरील खड्डयामुळे एकाचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. खोदकामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात बॅरिकेडिंग केले जात नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
सिंहस्थ कामांच्या खोदकामामुळे संपूर्ण नाशिककरांना वेठीस धरले जात आहे. एकाच वेळी सर्व शहर खोदून ठेवल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाळ्यात जर या खोदलेल्या खड्डयांमध्ये पाणी साचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण? त्यासाठी महापालिकेने काम करणार्‍या ठेकेदारांना नागरिकांच्या सुरक्षा उपायांसाठी कडक शब्दांत सूचना देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खोदकाम करताना नागरिकांच्या सुरक्षेकडे संपूर्णपणे कानाडोळा केला जात आहे. युटिलिटीची कामे करताना खोदकामाच्या आजूबाजूला कोणत्याच प्रकारचे बॅरिकेडिंग लावले जात नाही. रस्ता कुठे बंद आहे, कुठे सुरू आहे याबाबतही फलक दिसत नाहीत. खोदकामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग म्हणून वाळूच्या दोन-चार गोण्या कडेला ठेवण्यापलीकडे सुरक्षा केली जात नाही. बॅरिकेडिंग नसल्यामुळे अरुंद रस्त्यामुळे दुचाकीस्वार अथवा कार या खड्डयात कोसळण्याची भीती आहे.
गंगापूर रोडवर रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या तीव्र प्रकाशाच्या वाहनांमुळे डोळे दीपतात. त्यातून एखादा दुचाकीस्वार अथवा कारचालक रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्डयात पडण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, ठेकेदारांकडून उपाययोजना केल्या जात नसताना महापालिकेचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी मध्यंतरी पाहणी दौरा केला. मात्र, त्यानंतरही ठेकेदारांकडून कोणत्याच प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली गेलेली नाही. सातपूर येथील अपघात केवळ ठेकेदाराच्या सुरक्षा उपायांच्या अभावामुळेच झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पावसाळ्यात धोका वाढणार
खोदकामाचा सर्वाधिक धोका पावसाळ्यात वाढणार आहे. या खोदकामात पावसाळ्यात पाणी साचले आणि ते जर वाहनधारकाच्या लक्षात आले नाही, तर या खड्डयात वाहन कोसळण्याची शक्यता आधिक आहे. सध्या कामाचा वेग पाहता आणखी किती दिवस हे खोदकाम चालणार याबाबत काहीही निश्चिती नाही. खड्डयात पावसाचे पाणी साचल्यानंतर जर वाहनधारक त्यात कोसळला तर जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

Excavation work has become a threat to citizens’ lives.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *