एक्सक्युज मी सर…

 

सर, थँक् यू … आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याजोग ‘मोठ्ठं’ केलं त्याबद्दल.. आजच्या जगात जगण्यासाठी ‘परफेक्ट’ केलंत त्याबद्दल.. पण सर थोडी अजून अपेक्षा आहे तुमच्याकडून..
सर, कुटुंबापासून दुरावत चाललोय आम्ही.. संस्कृतीही विसरत चाललो आहे, असं वाटत नाही तुम्हाला.. खरं सांगू सर, छोट्या छोट्या गोष्टींचीही लाज वाटायला लागलीय आम्हाला आता… ज्या बापाने आभाळाएवढे कष्ट उपसून आम्हाला एवढे मोठे केले त्याचा मोठेपणा कळेनासा झालाय बघा सर, त्याचे विचारही आता बुरसट वाटायला लागलेत आम्हाला..
सर, तुम्ही मध्यस्थी करायला हवी आज.. पुस्तकाबाहेरच्या जगातील मुल्लेही उदाहरणांसह स्पष्टीकरण देऊन समजावून सांगायला हवीत आम्हाला. सर, खरंतर आता पाठीवर हात ठेवून भलेही शाबासकी देऊ नका, पण खांद्यावर हात ठेवून दोन गोष्टी समजाऊन सांगत चला आम्हाला सर. तुम्हीच समजावून सांगू शकता आम्हाला आणि तुम्ही समजावलेलच आम्हाला पटू शकत सर..!
खरं सांगू सर, आई-बापापेक्षा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आम्हाला जास्त जवळचे वाटायला लागलेत सद्ध्या.. मोबाईल तर अन्न-वस्त्र-निवारा यापेक्षाही महत्त्वाचा होऊन बसला आहे आमच्या या आयुष्यात. रागावू नका सर पण पुडी तोंडात टाकल्याशिवाय कामात मनही लागत नाही आता. व्हाट्सअँप , फेसबुक आणि आता आता इंस्टाग्राम हे आमच्या आयूष्याचा अविभाज्य भाग होवून बसलेय सर. आईच्या वाढदिवसाला आम्ही तिला समक्ष शुभेछ्या देण्याआधी फेसबुक वर शुभेछ्या देतो सर, अन त्या पोस्टवर शंभर लाईक्स आणि पन्नास कमेंट्स आल्या तरी वाढदिवस साजरा झाल्याचं मानसिक सुख आमच्या चेहर्यावर असते. पण ती बिचारी दिवसभर आमच्या बोलायची वाट बघत बसते सर. तुम्हीही असले आभासी संवाद साधायचे का हो ?? नाही ना.. सर प्लीज सांगा ना एकदा अगदी मनमोकळं तुम्ही कसे घडले ते… मोबाईल आणि बाईक शिवाय… जीन्स आणि मल्टिप्लेक्स शिवाय..! सोशल मिडियावरून ‘मेसेज’ पाठवण्या्पेक्षा पत्र लिहून ‘खुशाली’ कळवण्यात काय मजा असते तेही एकदा एक्सप्लेन करुन सांगून टाका की सर्वांनाच !
एखाद्या लेक्चरला आणू नका पुस्तक, खडू आणि डस्टरही.. फक्त तुम्ही या जुन्या आठवणींची शिदोरी घेऊन आणि भरभरून सांगा तुमच्या जुन्या दिवसांबद्दल.. चिखलाचा रस्ता तुडवत तुम्ही वेळेवर गाठली होतीच ना शाळा.. रस्त्याने चालताना स्लीपर फट्याक… फट्याक.. आवाज करत मागून चिखल उडवायची ना पँट वर… मग तरीही असे शाळा – कॉलेजला जातांना लाज वैगरे का वाटायची नाही तेही एकदा डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगा फक्त..आणि सांगून टाका आईने मारलेल्या धपाट्यापासून ते तळपायात भरलेल्या बाभळीच्या निब्बर काट्यांपर्यंत सगळचं… सर, तुमच्या डझनभर व्यक्तींच्या कुटुंबातल्या कोणाही व्यक्तीच्या पायाला नुसती ठेच लागून रक्त भळभळलं तरी सर्वांचाच जीव का हळहळायचा हो..? का होत असेल सर असं तेव्हा..? आणि आता का होत नाहीये असं…? आणि ऐका ना.. तुम्ही ‘सर’ असूनही, सुट्टीच्या दिवशी वावरत बारे देतांना तुम्हाला कसलाच कमीपणा का वाटला नाही हेही जरा समजाऊन सांगा प्लीज…
सर, वावरात पाणी भरतांना.. वाफ्यात, चिखलात उभं राहून फावड्याने पाणी वळवतांना ‘एक्झॅक्टली’ कसं वाटायचं ओ? आणि चुकून कधी ते फावड तुमच्या पायाला लागलं होतं सर? मग हो..? हायड्रोजन पेरॉक्साइड, बँडेज असायचं का तुमच्याकडे? आज सगळं सांगा सर.. सायकलच्या कॅरेजला अडकवून पाण्याचे हंडे वाहून आणायचे ना तुम्हीही? येताना चुकून हंडा पडला तर तुमचे वडील तुम्हाला भरचौकात मारायचे ना? सांगा सर आम्हालाही… कारण आता आम्हाला जेवताना साधा ग्लास भरून घ्यायला पण कमीपणा वाटतो, मार खायचं तर लांबची गोष्ट.. अहो साधं कुणी रागावल तरी आत्महत्येचा विचार आमच्या मेंदूच्या आरपार निघून जातो.. कधी कधी तो विचार आम्ही अमलात आणतोही… खरंतर कॉलेजच्या कॅन्टीनप्रमाणे घरातही पाय पसरून खायची सवय लागून चाललीय आम्हाला.. आईला जीव लावायचा तर सोडा पण तिची साधी कीवही येईनाशी झालीय आमच्यातल्या काहींना…आता बाईक शिवाय कॉलेज कॅम्पस मध्ये एंट्री करताना कुठेतरी कमीपणा ‘फिल’ होतो आहे सर.. तुम्ही तर चक्क सायकल आणि नंतर धूर फेकत.. फट..फट.. करणारी राजदूत कशी कॉलेज पर्यंत नेली ते समजत नाहीये.. लाज नव्हती का हो वाटत तुम्हाला? आमची सायकल तर शाळेबरोबरच सुटली.. त्यानंतर कित्येकदा ग्रुपमधल्या मायकल सोबत बाटलीही फुटली सर.. सॉरी सर.. विषय भरकटतो आहे जरा… पण एक खरं सांगू सर.. इथे तासभर एकाजागी बसून दगडातल्या देवाला समजून घेतात लोक.. पण जिवंत माणसाच्या शेजारी क्षणभर थांबून त्याच्या मनाची घालमेल नाही समजून घेत कुणी सध्या.. तुम्ही इथे इंटरफेअर करायला हवा सर नक्कीच.. कारण इतरांना सांगायला लावले तर सांगणाऱ्याला ‘उगाच वाईट होण्याचा’ आणि ऐकणाऱ्याला ‘कमीपणा घेतल्याचा’ प्रचंड मानसिक त्रास होऊन ते कदाचित डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे सर.. नाहीतर शेवटचा पर्याय आहेच तसा आत्महत्तेचा.. हो.. हो.. या असल्या थातुरमाथुर गोष्टीसाठी आत्महत्या करू शकतात ही मंडळी.. काही फालतू सिरिअल्स आणि चॅनेल्स पाहून त्यांचे विचार अतिशय टोकाचे होऊन गेलेत सर.. विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक वादविवाद आणि काही फालतू न्युज चॅनेल ने दिवसभर घरात बसून असणाऱ्यांचे डोकं फार बिघडवून ठेवले आहे सर.. तुमच्याही घरात डझनभर माणसे असायची ना सर.. पण तरी किती निखळ हसू असायचे सर तुमच्या चेहऱ्यावर.. आता आता घराघरात जाऊन बघाल तर फार स्वतःपुरता विचार करणारी माणसं भेटतील सर तुम्हाला. सर, तुमचे लग्न झाले तेव्हा तुमच्याही घरात सून आली आणि तुमच्या मुलीचेही लग्न झाले तेव्हा तीही सून होऊन गेली.. पण दोघींनीही त्या त्या कुटुंबाला आपलंस कस करून टाकलं ? जरी त्यांना स्वतःचा असा स्पेस मिळाला नाही तरी न भांडता त्या कशा स्वतःला कुटुंबात सामावून घेत गेल्या ते पण सांगूनच टाका सर.. करण इथे कुटुंबाच्या आनंदात स्वतःचा आनंद सापडता येत नाहीये सर आता यांना तुमच्यासारखा… सर, दिवसरात्र टीव्ही आणि मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेले माणसं कमी झाले तर आपोआपच हे प्रश्न सुटू शकतील असे नाही का वाटत तुम्हाला ?? आता तुम्हाला जे वाटत ते बिनदिक्कतपणे मांडणे तुम्ही सोडून दिले म्हणून ही परिस्थिती ओढवते आहे असे मला वाटते आहे सर…
सर, यावेळी क्लासमध्ये तुम्ही मनमोकळं सांगून टाका की, सायकलच्या दांडीला टॉवेल बांधून छोट्या भावंडांना तुम्ही गावभर फिरून आणायचे ते आणि हे पण सांगा मध्येच सायकलची चैन उतरली तर कशी तारांबळ उडायची तुमची… शिटाखाली ठेवलेला फडकं, रस्त्याने सायकलवर जाताना खडम-खडम करत येणारा स्टॅन्डचा आवाज आणि मडगार्डवर लावलेले ‘मेरा भारत महान’चे रबर.. या आणि असल्या सगळ्याच गोष्टी सांगून टाका सर…!
सर, शिकवत जा इंटिग्रेशन, हिस्टरी, इंटरनेट आणि नासा ने लावलेले शोधशी सांगत जा आम्हाला.. पण जरा वेळ काढून आजी-आजोबांशी बोलता का रे ? हेही नक्की विचारात जा कधी.. सर, असेल ना अजून एखादी आकाशगंगा, तेथेही असेल जीवसृष्टी अन कदाचित मंगळावर पाणी ही असेल.. पण माझ्या आईच्या डोळ्यातील पाण्याचे कारण शास्त्रीय थोडीच असणार… नासा थोडी त्याबद्दल काही भाष्य करू शकणार.. आजही घरी जायला जरा उशीर झाला तरीही किलकिले होतात हो तिचे डोळे.. तोंडावर हात फिरवून म्हणते ‘फार रहदारी असते रे, जीव लागून राहतो’ – सर अशा वेळी तिची समजूत कशी काढायची तेवढं सांगा फक्त .. बस्स…

अमोल जगताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *