22 नोव्हेंबरपर्यंत विशेष नियोजन
नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीच्या सुटीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने 1 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विविध मार्गांवर नियमित व जादा बसफेर्यांचे नियोजन केले आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ऐन दिवाळीच्या सणात होणारी 15 टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रवाशांवर आर्थिक भार पडू नये म्हणून एसटी महामंडळाने यंदाची हंगामी परिवर्तनशील भाडेवाढ पूर्णपणे स्थगित केली आहे. त्यामुळे यंदा प्रवाशांना कोणत्याही दरवाढीविना नेहमीच्या नियमित तिकिटातच दिवाळीचा प्रवास करता येणार आहे.
दिवाळीनिमित्त शिवाजीनगर (पुणे) मार्गावर सर्वाधिक 104 नियमित व जादा बसफेर्यांचा समावेश असून, बोरिवलीसाठी 12 नियमित बसफेर्या चालविण्यात येणार आहेत. याशिवाय, सप्तशृंगगडासाठी 22, तर त्र्यंबकेश्वरसाठी 40 बसफेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. संभाजीनगर मार्गावर 8, धुळे 10, साक्री 4 आणि नंदुरबार 6 जादा बसफेर्या सोडण्यात येणार आहेत. तसेच जळगावसाठी 1 आणि शिर्डीसाठी 6 जादा बसफेर्यांचे नियोजन आहे. कसारा मार्गावर 8, तर सटाणा मार्गावर 20 ई-बसफेर्या चालविण्यात येणार आहेत.
दिवाळीच्या काळात ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नंदुरबार, अहिल्यानगर, संभाजीनगर, शिवाजीनगर, धुळे आणि सटाणा या मार्गांवर वातानुकूलित ई-बस धावणार आहेत. याशिवाय, तालुका व ग्रामीण भागातील प्रवाशांची गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन जादा बसफेर्या चालविण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक विभागाकडून सांगण्यात
आले आहे.
Extra ST bus services during Diwali holidays