राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल काल लागला. यामध्ये काही अपवाद वगळता भाजपाने नेहमीप्रमाणे बाजी मारली. गेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता भाजपा सर्वच निवडणुका जिंकत आहे. त्यांच्या हाती आता निवडणुका जिंकण्याचा जादूचा दिवा लागला आहे. राज्याचा विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा तो दिवा आहे. त्यांच्या राजकारणाने राज्यात त्यांनी जवळजवळ सर्वच विरोधक संपवले आहेत. असे असले, तरी सर्वसामान्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली साथही महत्त्वाची आहे. काँग्रेसने आयत्या वेळी घातलेला घोळ आणि शरद पवारांचे उफाळलेले अदानी प्रेम यामुळे महाविकास आघाडीचे तीनतेरा वाजले असतानाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मिळवलेले यश महत्त्वाचे ठरले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या महानगरपालिका निवडणुका जिंकायच्याच, असा संकल्प सोडला होता. त्यानुसार त्यांनी आपली पावले टाकायला सुरुवात केली. यंदा कोणतेही कार्ड खेळायचे नाही, असे धोरण त्यांनी आखले. एका बाजूला संघाने आपली हिंदू-मुस्लिमद्वेषाचे राजकारण सुरू ठेवले, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात धनशक्ती कामाला आली. प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करून त्यानुसार तेथील नेत्यांना बरोबर गळाला लावण्यातही ते यशस्वी झाले. महाराष्ट्रातील नेते सहज विकले जातात, हे त्यांना बरोबर माहीत होते. त्यानुसार प्रत्येक महानगरपालिकेत त्यांनी आपली शक्ती लावली. प्रशासन त्यांच्या बाजूने होते. इतक्या खटल्यांचे निकाल न लागता, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतानाही त्यांनी आपल्या बाजूने वातावरण तयार केले. महानगरपालिकेत केवळ आपल्या पक्षाची ताकद वापरून चालत नाही. प्रतिस्पर्धी उमेदवाराची ताकदही कमी करावी लागते. त्यासाठी त्यांनी मग काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला हाताशी धरले. ही निवडणूक महायुती लढू शकणार नाही, हे त्यांनी बरोबर ताडले होते. त्यांना तशी गरजही नव्हती. त्यांना केवळ दिल्लीच्या आदेशानुसार केवळ उद्धव ठाकरे यांना संपवायचे होते. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी फोडली. शरद पवार सातत्याने ऐन निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतात किंवा भाजपाला फायदेशीर ठरेल अशी भूमिका घेतात, हे त्यांनी बरोबर ताडले होते. त्यासाठी त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अदानी यांना बारामतीला पाठवून पवार घराण्याला त्यांच्या मागे लावून दिले. इकडे राज ठाकरे अदानींच्या विरोधात भाषण करत असताना तिकडे शरद पवार व त्यांची कन्या खासदार व पुढे केंद्रीय मंत्री होऊ शकणार्या सुप्रिया सुळे यांनी अदानींचे गुणगान केले. अर्थात, लोकांनी त्याचे उत्तर मतपेट्यांमधून दिलेले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षाही शरद पवार यांच्या पक्षाची या निवडणुकीतील कामगिरी अगदीच सुमार दर्जाची झाली आहे. सर्वसामान्य जनतेला लढणारा राजा हवा असतो. केवळ स्वतःचा स्वार्थ जाणणारा राजा त्यांना नको असतो. त्यांचा काहीही उपयोग नाही, त्यांच्याविषयी काहीही विश्वास नाही, असे वातावरण तयार करण्यात फडणवीस यशस्वी झाले.
काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व हे कायम राहुल गांधी यांच्या विरोधात राहिले आहे. हेही फडणवीस यांना बरोबर माहीत होते. विधानसभेत नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले होते. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना बाजूला सारत अनेक विधाने देऊन महाविकास आघाडीत बिघाडी केली होती. महानगरपलिकेत हे काम सध्याच्या प्रदेशाध्यक्षांनी केले. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढती असे गोंडस नाव देऊन त्यांनी अनेक मतदारसंघांत अक्षरशः घाण केली. मुंबईत 159 क्रमांकाच्या वॉर्डात त्यांनी कारण नसताना उमेदवार दिला व उबाठाची ताकद कमी करण्याचे काम केले. त्याचा फायदा हा भाजपाच्या उमेदवाराला होऊन तो विजयी झाला. असे अनेक मतदारसंघांत घडले. आता काँग्रेसच्या उमेदवारांमुळे विशेष करून मुंबईत किती उबाठा उमेदवार पडले याची जर आकडेवारी काढली तर काँग्रेसने आपल्याला दिलेले काम चोख केले आहे, हे लक्षात येईल. मुंबईत काँग्रेसची कधीही सत्ता नव्हती. त्यांना काही ठराविक व्यक्तिगत उमेदवारांमुळे जागा मिळत असत. आता त्यांनी राज ठाकरे यांचा मुद्दा काढून उबाठाचे नुकसान केले. वंचित आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला. याच काँग्रेसने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितला बाजूला ठेवले होते. आपल्या मर्यादित शक्तीच्या जोरावर वंचितनेही उबाठाचे कसे नुकसान होईल, हे पाहिले. त्याचाही फायदा फडणवीस यांनी बरोबर उचलला.
फडणवीस यांनी यावेळी आपल्या मर्जीतल्या काही लोकांनाही आवर घातला. ज्यांना ते नेहमी विरोधकांवर सोडत असत त्यांना यावेळी त्यांनी लगाम घातला. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला नुकसान होईल असे काहीही विधान केले गेले नाही. मुंबई व मराठी भाषेविषयीही फडणवीसांनी केलेली विधाने त्यांच्या फायद्याची ठरली. ज्या ज्या ठिकाणी जे जे हवे आहे ते त्यांनी बरोबर ताडले. नाशिकमध्ये तपोवनाची झाडे तोडण्यावरून निर्माण झालेली स्थिती त्यांनी हाताळली. या आंदोलकांना नक्षली ठरवण्यात येईल, अशी भीती दाखवून त्यांनी सामान्य माणसांना या आंदोलनापासून दूर केले. ज्यांच्यावर केसेस होत्या त्यांना आपल्याकडे वळवून घेतले. नाशिकच्या जनतेला तपोवनापेक्षा आपल्याला मिळणारा फायदा महत्त्वाचा आहे. याचा विचार करून त्यांनी त्यादृष्टीने पावले टाकली. अशाच प्रकारच्या खेळी त्यांनी सर्वच महानगरपालिकांमध्ये खेळल्या त्याचा त्यांना फायदा झाला. या महानगरपालिका हातात आल्यामुळे भाजपाला व त्यांच्या मित्रपक्षाला आता मोठा फायदा होणार आहे. अदानी यांनाही आता राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावता येतील.
Fadnavis ‘The Great’
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…