♦ अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
♦ 35 किलो बनावट तूप आणि वनस्पती फॅट जप्त
♦ संशयितावर गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारा आणखी एक धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरात समोर आला आहे. शिंदेगाव येथील गौतमनगर भागात बेकायदेशीरपणे बनावट तूप तयार करणार्या एका अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेगाव येथील गौतमनगर भागातील सतीश गिरी (वय 28) हा तरुण भाडेतत्त्वावर राहत होता. या बंद खोलीत मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकार्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. संशयास्पद खोलीचे कुलूप तोडून आत झडती घेतली असता, पथकाचे डोळे चक्रावले. खोलीत स्टेनलेस स्टीलच्या डब्यांमध्ये सुमारे 35 किलो बनावट तूप आणि 15 किलो सुटे वनस्पती फॅट मिळाले.
संशयित सतीश गिरी हा अस्सल तुपाच्या नावाखाली वनस्पती फॅटची सर्रास भेसळ करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. डब्यातील तयार तुपात साधारण 4 ते 5 किलो वनस्पती फॅट मिसळले जात होते. हे भेसळयुक्त तूप नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक पुरुषोत्तम भड यांनी याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतीश गिरी (रा. गौतमनगर, शिंदेगाव, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले तूप आणि वनस्पती फॅटचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पवार करत आहेत.
Fake ghee factory busted in Nashik Road area.