बनावट आयपीएस अधिकाऱ्याने व्यावसायिकाची केली १ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक, खंडणीची धमकी

बनावट आयपीएस अधिकाऱ्याने व्यावसायिकाची केली

१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक, खंडणीची धमकी

सिडको : विशेष प्रतिनिधी

बनावट आयपीएस अधिकारी बनून एका व्यवसायकाची १ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलीस स्टेशन हद्दीत घडली.दरम्यान आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडित व्यवसायकांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल सखाराम वाकडे (वय ५६), व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. श्रीजी बंगला क्र. ५७, पाणिनी सोसायटीच्या मागे, वसंत नगर, राणे नगर, नाशिक-१० यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी गौरव रामअवतार मिश्रा (वय ३७), रा. मिश्रा हाऊस, महालक्ष्मी नगर, कामठवाडे, अंबड लिंक रोड, नाशिक याने २०१८ मध्ये त्यांच्याशी ओळख करून घेतली.
आरोपी मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्याचे भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून, लाल-निळ्या दिव्यांची गाडीतून फिरत असे. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचे दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला.
मिश्रा याने  वाकडे यांना रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. वाकडे यांनी मिश्रा याच्या विश्वासाने भारावून जाऊन त्याला एकूण १ कोटी ७ लाख ८८ हजार १०६ रुपये इतकी रक्कम दिली. यामध्ये रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सिक्युरिटी डिपॉझिट, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले.
मात्र, कालांतराने वाकडे यांना मिश्राच्या बनावटीची जाणीव झाली. त्यांनी मिश्राकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळाटाळ करू लागला. दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मिश्राने वाकडे यांना आगरा हॉटेल, पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथे १०-१२ गुंडांना सोबत घेऊन आलेल्या मिश्राने वाकडे यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिली. त्याने वाकडे यांना पैसे विसरून जाण्यास सांगितले. तसेच, त्यांच्याकडून दरमहा ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. वाकडे यांना माहिती झाली की इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये मिश्रा याच्याविरुद्ध बनावटपणाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्यांनी धैर्य एकवून अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिश्रा याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ३८४ (खंडणी), ५०६ (धमकी) आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याचे अंबड पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *